विराट कोहलीच्या मते हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे सर्वात धोकादायक

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आजपासून(24 फेब्रुवारी) दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना संध्याकाळी 7 वाजता विशाखापट्टणम येथे आज होणार आहे.

या सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना भारताचा कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनीस हा खेळाडू भारतासाठी धोकादायक ठरु शकतो असे म्हटले आहे.

स्टॉयनीसने नुकत्याच पार पडलेल्या बीग बॅश लीग (बीबीएल)मध्ये मेलबर्न स्टार्सकडून खेळताना 53.30 च्या सरासरीने 533 धावा केल्या आहेत. तसेच तो यावर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळणार आहे.

त्याच्याबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘मला जर प्रभाव पाडू शकेल अशा एका खेळाडूचे नाव घ्यायचे असेल तर तो खेळाडू स्टॉयनीस असू शकतो. तो बीबीएलमध्ये चांगला खेळला आहे आणि त्याची कामगिरीही चांगली झाली आहे. त्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे आणि तो त्यांच्या संघासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.’

‘काही खेळाडूंनी बीबीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पण आम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगला खेळ केला होता. तसेच दोन्ही टी20 सामने चूरशीचे झाले होते. एक सामना पावसामुळे रद्द झाला. ऑस्ट्रेलियाकडून आपण नक्कीच कठीण आव्हानाची आपेक्षा करतो.’

याबरोबरच विराटने मे मध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन टी20 सामन्यांऐवजी वनडे सामने घ्यायला हवे होते असेही मत मांडले आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2 टी20 आणि 5 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

याबद्दल विराट म्हणाला, ‘कदाचित दोन वनडे अजून मिळाले असते तर दोन्ही संघांना फायदा झाला असता. ही जास्त आदर्श आणि तार्किक गोष्ट आहे.’

‘पण आमच्याकडे जे आहे त्याचा सर्वोत्तम उपयोग करावा लागेल. एक संघ म्हणून चांगल्या मनस्थितीत राहण्याचा प्रयत्न असेल. सध्या आमचा संघ संतुलित आहे. मला कोणत्याही विभागात चिंता वाटत नाही. सर्वकाही जवळपास ठिक आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.