पुणे। सर्वांपर्यंत युवांचे टॅलेंट पोचावे यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणेरी पलटणतर्फे महाराष्ट्रात औरंगाबाद, नाशिक आणि पुणे अशा तीन शहरांमध्ये बोल कबड्डी या इंटर-क्लब कबड्डी टुर्नामेंट्सचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी असा हेतू ठेवून फ्रँचायजीतर्फे हे प्रयत्न करण्यात येत आहेत. पुणेरी पलटणने यावर्षी पुण्याबरोबरच औरंगाबाद आणि नाशिक येथील खेळाडूंनाही व्यासपीठ मिळावे म्हणून एक पाऊल पुढे टाकले आहे.
पुणेरी पलटणने आयपीअंतर्गत बोल कबड्डी या कबड्डीच्या टुर्नामेंट्स आयोजित केल्या आहे, या खेळातील प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून या स्पर्धा भरवण्यात येत आहेत. यंदा बोल कबड्डीअंतर्गत पुणेरी पलटणतर्फे इंटर-क्लब कबड्डी टुर्नामेंट्स महाराष्ट्रातील विविध भागात आयोजित करण्यात येत आहेत.
१७ ऑगस्ट २०१९पासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून तब्बल ४५ क्लब सहभागी होणार आहेत. १७ आणि १८ ऑगस्ट रोजी औरंगाबादेतील प्रोझोन मॉल येथून २४ टीमच्या सहभागाने या स्पर्धेच्या पहिल्या फेरीला सुरुवात होईल. ही चॅम्पिअनशीप औरंगाबाद कबड्डी फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. चॅम्पिअनशीपची दुसरी आणि तिसरी फेरी अनुक्रमे नाशिक आणि पुणे येथे घेतली जाईल.
या निमित्ताने इनशुअरकोट स्पोर्टसचे सीईओ कैलाश कांडपाल म्हणाले की, “महाराष्ट्र हे कबड्डीचे माहेरघर आहे आणि या राज्याने भारताला आणि प्रो कबड्डीला खूप श्रेष्ठ खेळाडू दिलेले आहेत. महाराष्ट्रातील आमच्या चाहत्यांशी जोडले जाणे गरजेचे आहे असे आम्हाला वाटते आणि यंदा आम्ही औरंगाबाद व नाशिक अशा आणखी दोन शहरांमध्ये टुर्नामेंट्सचे आयोजन केलेले आहे. क्लबच्या खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी आम्ही या स्पर्धांचे आयोजन करतो, भविष्यातही आम्ही असेच अनेक उपक्रम राबवू. या टुर्नामेंट्समधून पुणेरी पलटणला कदाचित नवे खेळाडू प्राप्त होतील.’’
पुणेरी पलटणच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील टॅलेंट असलेले खेळाडू समोर येण्यास मदत होणार आहे. उत्साह आणि अतिशय कष्टाने पुणेरी पलटणने आपला प्रवास सुरू केला आहे, विवो प्रो कबड्डी लीगच्या सातव्या भागात पुणेरी पलटणने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. टीम आपल्या शहरातून – पुण्यातून १४ सप्टेंबर २०१९ रोजी ते २० सप्टेंबर २०१९ रोजीपर्यंत मॅचेस खेळेल. श्री शिव छत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्स महालुंग, बालेवाडी येथे या स्पर्धा होतील.