पुणे। फर्ग्युसन कॉलेज आणि नंदन बाळ टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डी.ई.एस. फर्ग्युसन कॉलेज चॅम्पियनशीप सिरीज 18वर्षांखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत देशभरातून 100 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा फर्ग्युसन कॉलेज टेनिस कोर्ट या ठिकाणी 23 ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धा संचालक संग्राम चाफेकर व डॉ.आरजी परदेशी यांनी सांगितले की, स्पर्धेत गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, अहमदाबाद, दिल्ली या राज्यासह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या ठिकाणांहून खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक व गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सेजल केनिया यांची स्पर्धा निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने शनिवार, 23 व रविवार, 24 एप्रिल या दिवशी होणार असून मुख्य फेरीच्या सामन्यांना सोमवार 25एप्रिल 2022 पासून प्रारंभ होणार आहे.