‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’ मॅरेथॉनमध्ये १३०० धावपटू सहभागी

पुणे। ‘वुई आर सपोर्टींग ट्रान्सजेंडर’ असा सामाजिक संदेश देत पुणेकर जोमाने धावले. १३०० धावपटूंचा सहभाग असलेल्या या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ धावपटूंबरोबर लहान गटातील मुलांचा हौशीने सहभाग लक्षवेधी होता.

निमित्त होते ‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’ संस्थे अंतर्गत ‘लास्ट संडे ऑफ मंथ’ (LSoM) च्या वतीने ‘पुणे रनिंग मॅरेथॉन’चे. महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आणि सामाजिक दर्जा प्राप्त केलेली ‘पुणे रनिंग मॅरेथॉन’ रविवारी सकाळी उत्साहात पार पडली.

पुणे पीपल्स को-ऑप बँक अध्यक्ष जनार्दन रणदिवे, ‘अ‍ॅपलॉड’ एनजीओच्या कार्यकर्त्या अनुजा वाघोलीकर व अनुराधा वाघोलीकर आणि तृतीयपंथी सोनाली दळवी, संतोषी कदम यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ झाले.

ही मॅरेथॉन ‘वुई आर सपोर्टींग ट्रान्सजेंडर’ या सामाजिक संदेश संकल्पनेवर आधारित होती. ‘शनिवारवाडा पुण्याची शान, कसबा गणपतीचा पहिला मान, शिवरायांना कोटी कोटी प्रणाम, पेठ एलएसओएम धावून करूया पुण्यनगरीला सलाम, तृतीयपंथीयांना देऊ माणुसकीचा हात या चळवळीत लाभू दे सगळ्यांची साथ’ असा संदेश देत सहभागी धावपटूंनी मॅरेथॉन धावली.

रमणबाग शाळा, शनिवार पेठ येथून पहाटे ५.४५ वाजता ही मॅरेथॉन सुरु होऊन ६.३० वाजता संपली. या मॅरेथॉन चे ‘पेठ ग्रुप’ ने नेतृत्व केले. मॅरेथॉन धावणे अंतराची श्रेणी ३ कीमी, ५ कीमी, आणि १० कीमी अशी होती. केवळ सहभागीच नाही तर प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्याही लक्षणीय होती.

यावेळी ‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’चे अध्यक्ष सुधींद्र हरिभट, LSoM पेठ ग्रुप नेत्या सरिता राठी, LSoM मॅरेथॉनचे अध्यक्ष मिलिंद वाणी, राकेश वर्मा आणि तृतीयपंथी होते.

गेली नऊ वर्ष सामाजिक स्तरावर पुणे रनिंगच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. आपले सामाजिक म्हणणे अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मॅरेथॉनसारख्या व्यासपीठाचा उपयोग ‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’ संस्थेच्या वतीने केला जातो.

या कार्यक्रमाचे प्रायोजक पुणे पीपल्स को-ऑप बँक लि. तर मीडिया पार्टनर 95 बिग एफएम होते.

विविध उपक्रमाच्या सत्रांच्या अनोख्या पद्धती, उत्साही स्वयंसेवक-प्रशिक्षकांच्या माध्यमातून पुणे रनिंगने आधुनिक समाजात धावण्याचे आणि तंदुरुस्तीचे रूप बदलले आहे, असे जनार्दन रणदिवे (अध्यक्ष, पुणे पीपल्स को-ऑप बँक) म्हणाले.

जास्तीत जास्त नागरिकांमध्ये व्यायामाविषयी जागृती निर्माण होऊन धावपळीच्या जीवनात व्यायाम हा एक दैनंदिनी बनविणे या उद्देशाने ‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’ संस्थेच्या ‘लास्ट संडे ऑफ मंथ’ वतीने मॅरेथॉनचे आयोजन केले जाते, असे ‘पुणे रनिंग स्पोर्ट्स फाउंडेशन’चे अध्यक्ष सुधींद्र हरिभट म्हणाले.

‘अत्यंत दुर्लक्षित आणि गैरसमज अशा वातावरणात वावरणारा तृतीयपंथी समाज हा दुर्लक्षित समुदाय आहे. त्यामुळे अशा समाजाला काही मदत करता यावी या हेतूने ‘पुणे रनिंग’ मॅरेथॉनची संकल्पना ‘वुई आर सपोर्टींग ट्रान्सजेंडर’ ही आहे’, असे सरिता राठी म्हणाल्या.

पुणे येथील ‘अ‍ॅपलॉड’ ही स्वयंसेवी संस्था तृतीयपंथीयांना सक्षम करणे, प्रेरणा देणे आणि त्यांना सामान्य जीवन जगण्यास मदत करणे यासाठी कार्यरत आहे. ‘पुणे रनिंग’ च्या या मॅरेथॉनच्या संकल्पनेमुळे ‘तृतीयपंथीबद्दल भेदभाव करण्याऐवजी त्यांना सामाजिकरित्या स्वीकारू या आणि त्यांनाही आपल्या समाजाचा भाग बनवू’ असा संदेश पोहोचण्यास मदत होणार आहे, असे अनुजा वाघोलीकर आणि अनुराधा वाघोलीकर यांनी सांगितले.

You might also like