कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक काळ असाही होता, जेव्हा गोलंदाजांची दहशत वेगळीच होती. सुरुवातीचे कसोटी क्रिकेट हे वेगवान गोलंदाजांसाठी ओळखले जात होते. वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज तर क्रिकेटविश्वातील अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या चेंडूंच्या तालावर थिरकवत होते. अनेक फिरकीपटूंनीही आपली जादुई गोलंदाजी दाखवत कसोटी सामने जिंकून दिले.
तसं तर, कसोटी क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाला एका डावात ५-६ विकेट्स घेताना पाहणे साधारण गोष्ट आहे. मात्र, जर गोलंदाजाने एका डावात सर्व १० विकेट्स घेतल्या तर! तसं विचार केला तर, ही सरळ सरळ अशक्य गोष्ट वाटते. पण, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात असे असाधारण काम करणारे २ हिरे आहेत. त्यांनी कसोटी सामन्याच्या एका डावात आपल्या गोलंदाजीने विरुद्ध संघाच्या १० फलंदाजांचा पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.
त्यातील एक नाव म्हणजे भारताचा फिरकीपटू अनिल कुंबळे. कुंबळेने बरोबर २२ वर्षांपूर्वी ७ फेब्रुवारी १९९९ ला दिल्लीच्या फिरोजशहा कोटला स्टेडियमवर एका डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्याच्याआधी जिम लॅकर यांनी असा कारनामा केला होता. तर या लेखातून या दोन गोलंदाजांच्या या शानदार कामगिरीबद्दल जाणून घेऊया.
जिम लॅकर (वेगवान गोलंदाज) –
इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज जिम लॅकर यांनी सर्वप्रथम कसोटी क्रिकेटच्या एका डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅंचेस्टर येथील चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्यांनी हा पराक्रम केला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात केवळ ५३ धावा देत लॅकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या १० फलंदाजांना बाद केले होते. यावेळी त्यांचा इकोनॉमी रेट हा १.०३ इतका होता. याच सामन्यातील पहिल्या डावात लॅकर यांनी ९ विकेट्स घेतल्या होत्या. यासह कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात १० विकेट्स घेणारे आणि एका सामन्यात सर्वाधिक १९ विकेट्स घेणारे ते जगातील पहिलेच गोलंदाज ठरले.
विशेष म्हणजे, ६५ वर्षे झाली परंतु लॅकर यांचा एका कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम अजूनही अबाधित आहे. लॅकर यांनी त्यांच्या ११ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत ४६ सामन्यात १९३ विकेट्स घेतल्या होत्या.
अनिल कुंबळे (फिरकीपटू) –
भारताचा फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. दिल्लीत झालेल्या या सामन्यात कुंबळेने घेतलेल्या १० विकेट्समुळे भारताने २१२ धावांच्या फरकाने तो सामना खिशात घातला होता. कुंबळेने ७४ धावा देत पाकिस्तानच्या १० फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ४ विकेट्स घेतल्या होेत्या. यासह कुंबळेने जिम लॅकर यांचा कसोटीतील एका डावात १० विकेट्स घेण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली.
असे असले तरी, कुंबळे हा कसोटीच्या एका डावात १० विकेट्स घेणारा भारतातील पहिला आणि एकमेव गोलंदाज आहे. त्याने १८ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत १३२ सामन्यात ६१९ विकेट्स घेतल्या होत्या.
अतिशय मनोरंजक गोष्ट-
जिम लॅकर यांनी जेव्हा या १९ विकेट्स घेतल्या होत्या तेव्हा एक १० वर्षांचा मुलगा हा ऍशेस मालिकेतील हा सामना पाहण्यासाठी आला होता. त्यानंतर ४३ वर्षांनी व जवळपास १४४३ कसोटी सामन्यानंतर अनिल कुंबळेने डावात १० विकेट्स दिल्ली कसोटीत घेतल्या. यावेळी तो १० वर्षांचा मुलगा ५३ वर्षांचा झाला होता व तो हा सामना स्टेडियमवर पाहण्यासाठी उपस्थित होता.
त्या मुलाच नावं रिचर्ड स्टोक्स. रिचर्ड स्टोक्स हे जर्मनीमध्ये काम करत होते व ते कुंबळेच्या १० विकेट्स विक्रमाच्या वेळी कामानिमीत्त भारतात आले होते. विशेष म्हणजे स्टोक्स यांनी जीवनात फक्त दोनचं कसोटी सामने पाहिले होते.
ट्रेंडिंग लेख-
पदार्पणाच्या टी२० सामन्यात धुव्वांदार फलंदाजी करणारे ३ क्रिकेटर