क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात सलामीवीर फलंदाजाची भूमिका खूप महत्त्वाची असते. तो जर संघाला चांगली सुरुवात करून देत असेल, तर त्यामुळे पूर्ण संघाचं मोमेंट सेट होत असते. आणि त्यामुळे त्यांच्या विजयाचे प्रमाणही वाढत जाते. त्यामुळे सलामी फलंदाजावर खूप मोठी जबाबदारी असते. जर क्रिकेट इतिहासाबद्दल बोलायचं झालं, तर आज पर्यंत काही दिग्गज सलामी फलंदाज होऊन गेले आहेत.
सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, ऍडम गिलख्रिस्ट, मॅथ्यू हेडन, सौरव गांगुली, ग्रॅमी स्मिथ, सईद अन्वर, सुनील गावसकर आणि विरेंद्र सेहवाग यांसारख्या सलामी फलंदाजांनी आपली एक वेगळीच छाप क्रिकेटमध्ये सोडली आहे.
कोणत्याही खेळाडूला सलामीला फलंदाजी करणं खूप महत्त्वाचं असत. कारण सलामी फलंदाजीमुळे फलंदाजाला धावा करण्यासाठी खूप वेळ मिळतो. त्यामुळे ज्या फलंदाजांनी सलामीला फलंदाजी केली आहे. त्यांच्या जास्त धावा आहेत.
आज आपण त्या दोन दिग्गज भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना सलामीला फलंदाजी करण्यास संधी मिळाली नसती, तर ते आज एवढे मोठे सलामीवीर फलंदाज झाले नसते.
रोहित शर्मा
रोहित शर्माने (Rohit Sharma) जेव्हा आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरुवात केली. तेव्हा तो पाचव्या स्थानावर फलंदाजी करत होता. तो एका फिनिशरची भूमिका निभावत होता. २००७ च्या टी२० विश्वचषकात तो भारतीय संघात सलामीला फलंदाजी करत नव्हता. त्यावेळी गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) हे दोन दिग्गज सलामीवीर फलंदाज संघात होते.
पण २०१३ च्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एमएस धोनीने (MS Dhoni) रोहितपासून सामन्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय जबरदस्त मास्टर स्ट्रोक सिद्ध झाला. आज रोहित जगातील सर्वात खतरनाक सलामी फलंदाज झाला आहे. त्याने वनडेमध्ये ३ द्विशतके केली आहेत. आणि वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वात जास्त (२६४) धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.
रोहितने आतापर्यंत २२४ वनडे सामने खेळले आहेत. ज्यात ४९.२७ च्या सरासरीने २९ शतके आणि ४३ अर्धशतकांच्या मदतीने ९११५ धावा केल्या आहेत. आपण म्हणू शकतो, की जर धोनीने त्याला सलामीला फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला नसता, तर रोहित आज एवढा मोठा फलंदाज झाला नसता.
विरेंद्र सेहवाग
विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला मधल्या फळीत फलंदाजी करत होता. त्याने १९९९ मध्ये पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सुरुवातीचे ११ सामने त्याने मधल्या फळीत फलंदाजी केली. त्यानंतर १२ व्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध कोलंबोमध्ये त्याला सलामीला फलंदाजी करण्यासाठी सांगितले. त्याने त्या सामान्यात ५४ चेंडूत ३३ धावा केल्या. आणि भारत तो सामना हारला. पण तीन सामन्यांनंतर त्याने ७० चेंडूत ताबडतोब शतक करत स्वत:ला सलामी फलंदाज म्हणून सिद्ध केलं.
त्याने वनडे कारकीर्दीत २५१ सामन्यांत ३५.०५ च्या सरासरीने १५ शतकांसह ८२७३ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १०० पेक्षा जास्त राहिला आहे. तर १०४ कसोटी सामन्यात ४९.३४ च्या सरासरीने ८५८६ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने २ वेळा त्रिशतकं आणि ६ द्विशतकं केली आहेत. आणि १९ टी२० सामने खेळले आहेत. त्यामुळे तो वनडे क्रिकेट इतिहासात त्या दिग्गज खेळाडूंमध्ये सामील होतो. ज्यांच्या नावावर द्विशतक करण्याचा कारनामा आहे.
वाचनीय लेख-
-टीम इंडियाचे ‘हे’ २ फलंदाज, ज्यांच्या नावावर आहे गोलंदाजीतील आश्चर्यकारक विक्रम
-स्वत:च्या देशाबाहेरही चाहत्यांचे प्रेम मिळवणारे १० क्रिकेटपटू
-टीम इंडियाकडून कसोटीत सर्वात वेगवान अर्धशतक करणारे २ धडाकेबाज फलंदाज