कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२० अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. पण जेव्हा आयसीसीने टी२० विश्वचषक पुढे ढकलला, तेव्हा ही टी२० लीग खेळण्याचीही शक्यता वाढली. त्यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरपर्यंत युएईमध्ये आयोजण्यात आला आहे.
आयपीएलची सुरुवात व्हायला आता जवळपास २ आठवडे उरले आहेत. त्यामुळे सर्व संघातील खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी उत्सुकतेने तयारी करत आहेत. यंदाच्या आयपीएल संघातील खेळाडूंविषयी पाहायचं झालं तर, अनेक दिग्गज खेळाडू आणि युवा खेळाडूंचा संघांमध्ये समावेश आहे. तर, काही असेही खेळाडू आहेत, जे बऱ्याच दिवसांनंतर क्रिकेट खेळताना दिसणार आहेत.
त्यामुळे अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंनी भरलेल्या संघांना आपल्या संघातील अंतिम ११ खेळाडूंची निवड करणे फार कठीण जाणार आहे. अशात काही संघांचे कर्णधार त्यांच्या संघातील दिग्गज खेळाडूंपेक्षा युवा खेळाडूंवर जास्त विश्वास दाखवत, त्यांना अंतिम ११मध्ये संधी देऊ शकतात. त्यामुळे काही दिग्गजांना कदाचित आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळण्याची संधी मिळू शकत नाही. या लेखात, अशाच ५ दिग्गज खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे.
या पाच दिग्गज खेळाडूंना कदाचित नाही मिळणार आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळण्याची संधी (5 Legends Who Will Never Be Part Of Their Teams Playing XI In This Season) –
हरभजन सिंग- चेन्नई सुपर किंग्ज
भारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग हा आयपीएल इतिहासातील दमदार खेळाडू राहिला आहे. आयपीएलच्या सर्वात यशस्वी मुंबई इंडियन्स संघाचे १० हंगामात प्रतिनिधित्त्व केल्यानंतर तो २०१८साली चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघात सामील झाला. गेल्या २ हंगामात हरभजनला सीएसकेकडून हंगामातील सर्व सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. तरी, त्याला जेवढी संधी मिळाली तेवढ्यात त्याने दमदार प्रदर्शन केले.
हरभजनने आतापर्यंत सीएसकेकडून २४ सामने खेळत २३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या तेराव्या हंगामातही हरभजन सीएसकेचाच भाग आहे. परंतु, सध्या संघात रविंद्र जडेजा, इमरान ताहिर आणि मिचेल सेंटनर हे प्रभावी फिरकीपटू उपलब्ध आहेत. त्यामुळे कदाचित हरभजनला या हंगामात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळणार नाही.
अजिंक्य रहाणे- दिल्ली कॅपिटल्स
भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे हा कसोटी क्रिकेटमधील शानदार खेळाडू आहे. पण, मर्यादित षटकांच्या भारतीय क्रिकेट संघामध्ये त्याला जास्त संधी देण्यात येत नाही. असे असले तरी, तो २० षटकांच्या आयपीएलमध्ये सातत्याने खेळताना दिसतो. तो गेल्या हंगामांपासून आयपीएलच्या राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. पण, यंदा त्याची निवड दिल्ली कॅपिटल्स संघात झाली आहे.
त्यामुळे रहाणे हा दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. या सलामीवीर फलंदाजाव्यतिरिक्त दिल्ली संघात शिखर धवन, पृथ्वी शॉ हे सलामीवीर फलंदाज उपलब्ध आहेत. त्यांची दिल्ली संघाकडून खेळतानाची आतापर्यंतची आकडेवारी देखील उल्लेखनीय आहे. त्यामुळे कदाचित रहाणेपेक्षा धवन आणि शॉला सलामीला फलंदाजीला उतरवण्यासाठी प्राथमिकता देण्यात येऊ शकते. त्यामुळे रहाणेला पूर्ण हंगामात एकही सामना न खेळता रहावे लागू शकतो.
मोहम्मद नबी- सनरायझर्स हैदराबाद
अफगाणिस्तान संघाचा अनुभवी फिरकी अष्टपैलू मोहम्मद नबी हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. ज्याने आयपीएलमध्येही सतत स्वत: ला सिद्ध केले आहे. पण त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघ त्याला या वेळी खेळण्याची फारच कमी संधी देऊ शकेल.
सनरायझर्स हैदराबादचा संघही ४ परदेशी खेळाडूंच्या समस्येवर झगडताना दिसू शकतो. या संघात जॉनी बेअरस्टो, डेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन आणि राशिद खान दिसणार आहेत. ज्यामुळे मोहम्मद नबीचा नंबर दिसत नाही.
मोहम्मद नबी आतापर्यंत आयपीएलमध्ये १३ सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने १५ च्या सरासरीने १३५ धावा केल्या आहेत. नबीचा स्ट्राइक रेट १४८.३५ आहे. जर त्याच्या गोलंदाजीबद्दल चर्चा केली तर त्याने २७.१८ च्या सरासरीने ११ बळी घेतले आहेत. ज्याला एक उत्कृष्ट कामगिरी म्हटले जाऊ शकते.
ऍरॉन फिंच- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
मर्यादित षटकांच्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच हा २०१०पासून आयपीएलचा भाग आहे. आतापर्यंत आय़पीएलच्या ४ वेगवेगळ्या संघांकडून खेळलेला फिंच हा यंदा आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाचा भाग आहे. तो एक जबरदस्त सलामीवीर फलंदाज आहे. पण, आरसीबीमध्ये विराट कोहली आणि पार्थिव पटेल यांची जोडी नेहमी सलामीला फलंदाजी करत आलेली आहे. त्यामुळे संघ आपल्या सलामी जोडीला कदाचित तोडू शकत नाही. त्यामुळे फिंचला पूर्ण हंगामात आरसीबीकडून एकही सामना खेळायला मिळण्याची शक्यता नाही.
फिंचची आयपीएलमधील आतापर्यंतची आकडेवारी पाहिली तर, त्याने आतापर्यंत ७५ सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने २५.९३च्या सरासरीने १७३७ धावा केल्या आहेत.
डेल स्टेन- रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
दक्षिण आफ्रिकाचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याने आपल्या दुखापती आणि फिटनेसच्या समस्यांचा सामना करत क्रिकेटजगतात स्वत एक दमदार खेळाडू असल्याचे सिद्ध करुन दाखवले. तो यंदा आयपीएलच्या आरसीबी संघाचा भाग आहे. यापुर्वी त्याने आरसीबीकडून ३० सामने खेळत ३१ विकेट्स घेतल्या होत्या.
पण, यंदा आरसीबीची वेगवान गोलंदाज फळी खूप मजबूत असल्याची दिसत आहे. कारण, संघात क्रिस मॉरिस, इसुरु उडाना आणि उमेश यादव हे शानदार वेगवान गोलंदाज उपलब्ध आहेत. त्यामुळे स्टेनला पूर्ण हंगामात संघाबाहेर रहावे लागू शकते.
ट्रेंडिंग लेख-
-किंग्ज इलेव्हन पंजाबचे हे ३ दिग्गज खेळाडू आयपीएलमध्ये झाले सुपर फ्लॉप
-आजोबा, मुलगा व नातू अशा तीन पिढ्या क्रिकेट खेळलेल्या घरातील नातवाची गोष्ट
-असे ५ परदेशी क्रिकेटर, जे आयपीएलमधून कमवतात सर्वाधिक पैसे
महत्त्वाच्या बातम्या-
-माझा रैनावर काहीही अधिकार नाही, त्याच्या कमबॅकचा निर्णय घेणार हा व्यक्ती
-दिग्गजाने निवडले ५ भारतीय खेळाडू, जे घेऊ शकतात सुरेश रैनाची जागा