भारताची टी२० लीग आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणून ओळखली जाते. खेळाडूंना कोटीच्या कोटी रकमांनी खरेदी करून क्रिकेटचा हा उत्सव दरवर्षी भरवला जातो. भारतातील आठ शहरांच्या नावाने आठ संघ यात समाविष्ट होत असतात.
आयपीएल केवळ देशातच नाही तर परदेशातही खूप पसंत केली जाते. परदेशी खेळाडू मोठ्या प्रमाणात लीगचा भाग असल्याने त्या त्या देशातील क्रिकेटप्रेमी आयपीएलचा मनमुराद आनंद लुटतात.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये हजारो खेळाडूंनी भाग घेतला. पण, असे काही खेळाडू आहेत जे ज्या संघाकडून खेळले नंतर त्याच संघाचे प्रशिक्षक बनले.
अशाच पाच खेळाडूंविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांनी आपल्या पूर्व संघासाठी प्रशिक्षणाचे काम देखील केले आहे.
१) डॅनियल व्हेटोरी
न्यूझीलंडचा माजी कर्णधार व फिरकी गोलंदाज डॅनियल व्हेटोरी याच्या दैदिप्यमान क्रिकेट कारकिर्दीबद्दल सर्वांना माहितीच आहे. परंतु, व्हेटोरी त्या खेळाडूंपैकी आहे जे खेळाडू म्हणून ज्या संघासाठी खेळले त्याच संघासाठी नंतर प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
व्हेटोरीने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्लीची कॅपिटल्स) पासून केली. पहिल्या तीन सत्रात तो दिल्लीबरोबर होता पण, चौथ्या सत्रात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला त्यांच्या संघात समाविष्ट केले.
२०११ व २०१२ मध्ये आरसीबीकडून खेळल्यानंतर तो २०१४ मध्ये या संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला. परंतु, प्रशिक्षक आणि खेळाडूंची कायम आदलाबदली केल्याने आरसीबीच्या संघाचे भाग्य बदलू शकले नाही. आरसीबीने आजपर्यंत एकही आयपीएल करंडक जिंकलेला नाही.
प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरीच्या नेतृत्वातही संघाची कामगिरी निराशाजनक होती. तो २०१८ पर्यंत संघाचा प्रशिक्षक राहिला. या पाच वर्षात, आरसीबी फक्त एकदा अंतिम फेरी गाठू शकली.
आयपीएल २०१६ च्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभूत झाल्याने आरसीबीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आयपीएल २०१७ आणि २०१८ मोसमात संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरला. यानंतर फ्रँचायझीने त्याला प्रशिक्षकपदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
२) स्टीफन फ्लेमिंग
चेन्नई सुपरकिंग्ज हा आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. चेन्नईने ३ वेळा आयपीएल करंडक जिंकला आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात चेन्नई संघात एक खेळाडू होता जो दुसर्याच वर्षी संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त झाला.
तो खेळाडू म्हणजे, न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेला स्टीफन फ्लेमिंग. ज्याला चेन्नई सुपर किंग्जने २००८ आयपीएलमध्ये आपल्या संघात खेळाडू म्हणून निवडले होते. त्यावर्षी त्याने १० सामन्यात २१ च्या सरासरीने आणि ११८ च्या स्ट्राइक रेटने १९६ धावा केल्या.
२००९ पासून आजतागायत फ्लेमिंग हाच सीएसकेचा मुख्य प्रशिक्षक आहे. चेन्नईने आतापर्यंत सर्व मोसमात आयपीएलची प्ले ऑफ फेरी गाठलेली आहे. यादरम्यान त्यांच्या नावे तीन विजेतेपद देखील आहेत. दोन वर्ष चेन्नईचा संघ निलंबित झाला तेव्हा, फ्लेमिंगने रायझिंग पुणे सुपरजायंट संघाचा प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
३) राहुल द्रविड
भारतीय क्रिकेट संघाचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविड हा देखील एकाच संघासाठी खेळाडू व प्रशिक्षक झालेल्या खेळाडूंच्या यादीत आहेत. द्रविडने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूपासून केली. पहिली तीन सत्रे आरसीबीमध्ये राहिल्यानंतर त्याला २०११ मध्ये राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
२०१३ नंतर त्याला राजस्थान रॉयल्सचा प्रशिक्षक बनविण्यात आले. राजस्थान संघाने आयपीएल २०१४ मध्ये चांगली सुरुवात केली होती. पण, शेवटच्या सामन्यात खराब कामगिरीमुळे संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही. अखेरच्या साखळी सामन्यात, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवानंतर राहुल द्रविडचा राग पाहण्यासारखा होता.
२०१६ मध्ये राजस्थान संघाचे निलंबन झाल्यानंतर तो दिल्ली संघाचा प्रशिक्षक झाला. सध्या तो, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक म्हणून काम पाहतो.
४) शॉन पोलॉक
द. आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉकने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली. २००८ च्या आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते.
श्रीशांतला थप्पड मारण्यानंतल हरभजनसिंगवर बंदी घालण्यात आली तेव्हा, पोलॉकने काही सामन्यांमध्ये मुंबईचे नेतृत्व केले. त्या मोसमात त्याने १३ सामन्यांत ११ गडी बाद केले. त्यावर्षी पोलॉकने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
त्यानंतर, पोलॉकची मुंबई इंडियन्सकडून गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली गेली. २००९ ते २०१३ पर्यंत तो मुंबई संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. मुंबई संघाने २०१३ मध्येच प्रथम आयपीएल करंडक जिंकला होता.
२०१३ मध्येच पोलॉक प्रशिक्षकपद सोडत मुंबई इंडियन्समधून बाहेर पडला. आता तो समालोचन करताना दिसत असतो.
५) ब्रेंडन मॅक्युलम
न्यूझीलंडचा कर्णधार राहिलेल्या ब्रेंडन मॅक्युलमने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात संपूर्ण जगाचे लक्ष इंडियन प्रीमियर लीगकडे आकर्षित केले. त्याने, आयपीएल कारकीर्दीची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्ससाठी केली आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १५८ धावांची खेळी केली.
टी२० क्रिकेटमधील त्यावेळची ही सर्वात मोठी खेळी होती. यानंतर केकेआर व्यतिरिक्त तो चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात लायन्स आणि कोची टस्कर्स केरळ या संघातही खेळला.
गेल्यावर्षी त्याने, ग्लोबल कॅनडा लीगमध्ये खेळल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर लगेचच कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपला मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमले.
मॅक्युलमच्या आयपीएल आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने आयपीएलमध्ये एकूण १०९ सामने खेळत १३१.७५ च्या स्ट्राईक रेटने २८८० धावा केल्या आहेत. केकेआरने आत्तापर्यंत २ आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. पण, २०१४ नंतर त्यांनी आयपीएलची ट्रॉफी जिंकलेली नाही. २०१९ मध्ये संघाने प्ले ऑफमध्ये पात्रताही मिळविली नव्हती. कोलकाता संघाला ट्रॉफी जिंकून देण्याची जबाबदारी मॅक्युलमवर आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना फ्लॉप झालेले ३ दिग्गज परदेशी खेळाडू
एकाच वनडेत ५० पेक्षा अधिक धावा करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ४ भारतीय क्रिकेटर
वाढदिवस विशेष: वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा हॅमिल्टन मासाकात्झा
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही स्टोक्स; जाणून घ्या कारण…
दुखापतग्रस्त नसूनही वेस्ट इंडिजचा ‘हा’ खेळाडू सीपीएलमधून बाहेर; कारण जाणून दंग व्हाल…
रिषभ पंतने ‘या’ दिग्गजाचा ऑटोग्राफ घेतलेला फोटो केला शेअर, सोबत लिहिला भावनिक मेसेज