मुंबई । वेस्ट इंडिजचा धडाकेबाज युवा फलंदाज निकोलस पूरन याने आपल्या फलंदाजीने दिग्गज खेळाडूंना प्रभावित केले आहे. सीपीएलमध्ये धमाका केल्यानंतर आता तो आयपीएल खेळण्यासाठी सज्ज आहे. आयपीएलमध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधीत्व करतोय. भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने निकोलस पूरनचे कौतुक केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने स्टार स्पोर्ट्समधील टॉक शो दरम्यान सांगितलेकी, डावखुरा युवा वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन याच्याकडे विश्व क्रिकेटमधील प्रत्येक शॉट आहे. तो म्हणाला की, ‘हा फलंदाज दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्सप्रमाणे क्रिकेटमधला प्रत्येक शॉट खेळण्यात पारंगत आहे.’
तो म्हणाला, “आयपीएलच्या या हंगामात निकोलस पुरनला एक तरुण खेळाडू म्हणून जवळून पाहायला मला आवडेल. 360 डिग्री खेळाडू म्हणून आपण एबी डिव्हिलियर्सबद्दल बोलतो, पण निकोलस पूरनमध्ये सर्व शॉट्स आहेत. तो रिव्हर्स स्वीप खेळू शकतो, सामान्य स्वीप खेळू शकतो आणि सर्व मोठे शॉट्स खेळण्याची क्षमता त्याच्यात आहे.”
त्याच्याकडून उत्कृष्ट कामगिरी करुन घेण्यात कुंबळे यशस्वी होईल
“जेव्हा निकोलस पूरनसारखा एखादा खेळाडू अनिल कुंबळेसारख्या महान प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली खेळतो, तेव्हा तो खूपच चांगला खेळाडू बनतो. मला विश्वास आहे की, अनिल कुंबळे त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेऊ शकतील,” असेही गौतम गंभीरने नमूद केले.
निकोलस पूरन सध्याच्या काळात जगातील सर्वात प्रतिभाशाली खेळाडूंपैकी एक मानला जातो. आयपीएलमध्येही त्याने अनेक वेळा आपल्या प्रतिभेची चुणूक दाखविली आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने वेस्ट इंडीयनच्या या युवा यष्टीरक्षक फलंदाजास 4.2 कोटी किंमतीला विकत घेतले आहे.
निकोलस पूरनने आयपीएल 2019 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी एकूण 7 सामने खेळले, ज्यात त्याने 28 च्या सरासरीने 168 धावा केल्या. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट 157.01 आहे. त्याने आयपीएल 2019 मध्ये काही शानदार डाव खेळले आहेत.
निकोलसने वेस्ट इंडिजकडून 21 टी -20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 23.53 च्या सरासरीने आणि 124.73 च्या स्ट्राइक रेटने एकूण 353 धावा केल्या आहेत.