मुंबई । अष्टपैलू खेळाडूंचा क्रिकेटमध्ये एक काळ होता. त्यावेळी इंग्लंडचे सर इयान बोथम, न्यूझीलंडचे सर रिचर्ड हेडली, पाकिस्तानचे इम्रान खान आणि भारताचे कपिल देव या अष्टपैलू खेळाडूंनी तो काळ आपल्या खेळाने गाजविला. यांच्यात एक प्रकारची स्पर्धा दिसून यायची. खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीत वेगवेगळे टप्पे गाठले. आपापल्या देशांसाठी बर्याच संस्मरणीय कामगिरी बजावल्या.
भारताला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनी नुकत्याच झालेल्या पॉडकास्टमध्ये सांगितले की, ‘अन्य तीन अष्टपैलू खेळाडूंपेक्षा ते एक चांगले खेळाडू होते.’ 1970 आणि 80 च्या दशकात हे चारही अष्टपैलू खेळाडू वर्चस्व गाजवत होते. आकडेवारीचा विचार केला तर या सर्व गोष्टींमध्ये कपिल आघाडीवर असल्याचे दिसते.
61 वर्षीय माजी कर्णधाराने अन्य तीन अष्टपैलू खेळाडूंच्या कौशल्यांचे कौतुक केले. त्यांनी सर हेडलीला सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि इम्रान खानला सर्वात मेहनती खेळाडू असल्याचे म्हटले.
ते म्हणाले ‘आमच्या चारपैकी रिचर्ड हेडली सर्वोत्कृष्ट गोलंदाज होते. ते संगणकासारखे होते. मी असे म्हणणार नाही की इम्रान खान सर्वोत्कृष्ट खेळाडू होते, परंतु तो सर्वात मेहनती खेळाडू होता.’