ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना यजमान संघाने ८ विकेट्सने जिंकला. यामध्ये भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. भारतीय संघाच्या युवा खेळाडूंना चमकदार कामगिरी करता आली नाही. आता यानंतर भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज वसीम जाफरने सध्याच्या युवा खेळाडूंबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जाफरने म्हटले आहे की, युवा खेळाडू ज्या प्रकारे कसोटी क्रिकेटला अधिक महत्त्व देत नाहीत, तो एक मोठा चिंतेचा विषय आहे. त्याने युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेटवर अधिक लक्ष देण्याचा सल्लाही दिला आहे.
…तेव्हाच तुम्ही महान खेळाडू बनू शकता
“मी पाहिले आहे की, अधिकतर युवा खेळाडू कसोटी क्रिकेटऐवजी मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर अधिक लक्ष देत आहेत. हा चिंतेचा विषय आहे. कारण शेवटी जेव्हा तुम्ही कसोटी सामन्यांमध्ये धावा करता, तेव्हाच महान खेळाडू तेव्हाच बनू शकता,” असे एका मुलाखतीदरम्यान जाफर म्हणाला.
जाफरने भारतीय संघाकडून आतापर्यंत ३१ कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने ३४.१० च्या सरासरीने १९४४ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतकेही ठोकली आहेत. सोबतच त्याच्या नावावर दोन द्विशतकांचीही नोंद आहे. त्याने पुढे बोलताना म्हटले की, “आजच्या युवा खेळाडूंसमोर तिन्ही क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करणे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. आयपीएलमध्ये खेळणे चुकीचे नाही. परंतु तुम्ही कसोटी क्रिकेटला दूर लोटू शकत नाही.”
पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ३६ धावांवर तंबूत
विशेष म्हणजे पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात संपूर्ण भारतीय संघ अवघ्या ३६ धावांवर तंबूत परतला होता. हा एक लाजिरवाणा विक्रम आहे. संघाचा कोणताही खेळाडू १० पेक्षा अधिक धावा करू शकला नव्हता. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात यजमान संघाकडून ८ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ १-०ने आघाडीवर आहे. अशामध्ये उर्वरित ३ कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाला पुनरागमन करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. शिवाय मोठी बाब म्हणजे कर्णधार विराट कोहली पुढील तीन सामन्यांत अनुपस्थित आहे. तो आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मासाठी पालकत्व रजा घेऊन भारतात परतला आहे.
जाफरची देशांतर्गत कामगिरी
देशांतर्गत क्रिकेटमधील जाफरच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत प्रथम श्रेणीतील २६० सामन्यांमध्ये ५०.६७ च्या सरासरीने १९४१० धावा ठोकल्या आहेत. यामध्ये ५७ अर्धशतकांचाही समावेश आहे. सोबतच त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद ३१४ आहे.
दुसरा कसोटी सामना खेळण्यात येणार २६ डिसेंबरला
उभय संघातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे खेळण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘बॉक्सिंग डे’ कसोटीत टीम इंडिया उतरणार नव्या जोशात; जडेजा, राहुल, गिलची संघात होणार एन्ट्री?
पुढच्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया संघालाच भारतात आणू, फॅन्सच्या मजेशीर प्रश्नाला सोनू सूदचं उत्तर