भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा उत्कृष्ट कर्णधार असण्याबरोबर दमदार फलंदाज आणि उत्तम यष्टीरक्षक देखील आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून (२००८) धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचा (सीएसके) भाग आहे. धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेने तीनवेळा आयपीएल ट्रॉफी पटकावली आहे.
आज सीएसकेला आयपीएलच्या सर्वात यशस्वी संघांमध्ये गणले जाते. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, धोनीमुळे सीएसकेला नवी ओळख मिळाली आहे. पण, एक वर्ष झाले धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाही. १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे एका वर्षाच्या विलंबानंतर धोनीचे चाहते त्याला क्रिकेट खेळताना पाहतील.
पण, धोनी आता ३९ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे क्रिकेट क्षेत्रात त्याच्या भविष्याबाबत चर्चा होत आहे. धोनी आयपीएल २०२०मध्ये तर सर्वांना खेळताना दिसणार आहे. परंतु, यापुढे काय? धोनी पुढील हंगामात सीएसकेची कमान सांभाळणार का नाही? तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार का नाही? असे अनेक प्रश्न धोनीच्या चाहत्यांच्या मनात येत असतील. पण, पाच कारणांमुळे धोनी आयपीएलच्या १५व्या हंगामापर्यंत अर्थात २०२२ पर्यंत आयपीएलमध्ये खेळताना दिसू शकतो. त्या ५ कारणांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
पाच कारणे ज्यामुळे धोनी २०२२ पर्यंत आयपीएलमध्ये खेळताना दिसेल (Ms Dhoni Can Play Since IPL 2022 Due To 5 Reasons) –
१. सीएसकेला कर्णधाराची आवश्यकता –
आयपीएल इतिहासातील दूसरा सर्वात यशस्वी संघ असणाऱ्या सीएसकेच्या नेतृत्त्वाची धुरा धोनीने २००८ पासून सांभाळली आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली संघाने २०१०, २०११ आणि २०१८मध्ये आयपीएल ट्रॉफी पटकावली आहे. सोबतच सीएसकेने २००८, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९मध्ये अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे.
आपल्या नेतृत्त्वाखाली संघाला ८वेळा अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवणे आणि त्यापैकी ३वेळा संघाला विजेतेपद मिळवून देणे, हे काही साधारण कामगिरी नाही. तसेच, मैदानावर झटपट निर्णय घेत सामन्याचा कायपालट करण्याची क्षमता देखील धोनीमध्ये आहे. अशात, सीएसकेच्या नेतृत्त्वपदासाठी धोनीनंतर सुरेश रैनाला संधी दिली जाऊ शकते.
पण, रैनाला चाहत्याकडून धोनी इतकी पसंती मिळेल का नाही, हे सांगणे कठीण आहे. तसेच रैनाची सीएसकेचा कर्णधार म्हणून खास अशी कामगिरी नाही.रेनाने सीएसकेचे ६ सामन्यात नेतृत्व केले आहे, त्यातील केवळ २ सामन्यात विजय मिळवता आले आहे. त्यामुळे धोनीने संघाला सोडले तर संघासोबत चाहत्यांनादेखील त्याची कमी भासेल. त्यामुळे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की, धोनी २०२२ पर्यंत आयपीएलमध्ये खेळताना दिसेल.