fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

त्या १४ धावा अशा होत्या की सचिनने लगेच उंचावली होती बॅट

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरच्या नावावर अनेक विश्वविक्रम आहेत. असाच एक विश्वविक्रम 17 ऑक्टोबर 2008 ला सचिन तेंडूलकरच्या नावावर झाला होता. तो वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लाराला मागे टाकत कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता. या घटनेला 17ऑक्टोबर 2020ला 12 वर्ष पूर्ण होतील.

2008 मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 14 धावा करताच सचिनने कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.

2006मध्ये निवृत्ती घेतलेल्या लाराने कसोटीमध्ये 131 सामन्यात 52.88 च्या सरासरीने 11953 धावा केल्या होत्या. त्यावेळी तो कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.

पण आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया संघातील कसोटीत 17 ऑक्टोबर 2008 ला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पीटर सीडलच्या गोलंदाजीवर 14 वी धाव घेतली आणि त्यांच्या या विक्रमाला मागे टाकले होते. त्यावेळी सचिनने बॅट उचलत अभिवादन केले होते. यावेळी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही त्याचे अभिनंदन केले होते.

या घटनेचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या सामन्यात सचिनने पहिल्या डावात 88 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात नाबाद 10 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 320 धावांनी जिंकला होता.

या सामन्यानंतर पुढे जाऊन सचिनने कसोटीमध्ये 15 हजार धावांचा टप्पाही पार केला. त्याने 200 कसोटी सामने खेळताना 15921 धावा केल्या. सध्या कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत सचिनच अव्वल क्रमांकावर आहे.

तसेच सचिननंतर लारा यांच्या 11953 धावांच्या विक्रमाला रिकी पॉटिंग, जॅक कॅलिस, राहुल द्रविड, ऍलिस्टर कूक आणि कुमार संगकारा यांनीही मागे टाकले. पण यांच्यातील कोणालाही सचिनच्या 15921 धावांच्या विक्रमाच्या जवळपासही जाता आले नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रिकी पाॅटींग असून त्याने 168 कसोटीत 13387 धावा केल्या आहेत.

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या-

४ मराठमोळे खेळाडू ज्यांनी केल्या आहेत क्रिकेटमध्ये १०हजारपेक्षा जास्त धावा
तर आयपीएलचे सर्व सामने महाराष्ट्रातील या ४ स्टेडियमवर होणार
या ५ खेळाडूंना आहे वनडेत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय
वनडेत १० हजार धावा, १०० विकेट व १०० झेल घेणारे फक्त ६ खेळाडू, दोन आहेत भारतीय

 

You might also like