आयपीएलच्या 13 व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात एक षटक टाकल्यानंतर दिल्लीचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन दुखापतग्रस्त झाला होता. तो आता पुढच्या सामन्यात दिल्लीसाठी खेळू शकेल की नाही याचे उत्तर दिल्लीचे गोलंदाजी प्रशिक्षक रायन हॅरिस यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले, अश्विन बरा झाला असून तो पुढच्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असू शकतो.
दिल्लीला पुढील सामन्यात (शनिवारी, 3 ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळायचे आहे. शारजाहच्या मैदानावर रात्री 7.30 वाजता हा सामना खेळला जाईल.
नेटमध्ये केला सराव
अश्विनबद्दल बोलताना हॅरिस म्हणाले, “दुखापतीतून सावरल्यानंतर तो सराव करत आहे. काल रात्री त्याने नेट मध्ये गोलंदाजीसह फलंदाजीचाही सराव केला. त्यामुळे, तो (शनिवार होणाऱ्या) निवडीसाठी उपलब्ध असू शकेल. परंतु आम्ही सध्या आमच्या वैद्यकीय कर्मचार्यांच्या पुष्टीची प्रतीक्षा करीत आहोत.”
खेळाडूंनी केली नाही सर्वोत्कृष्ट कामगिरी
दिल्लीने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर या संघाचा सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 15 धावांनी पराभव झाला होता. पराभवाबद्दल हॅरिस म्हणाले, “त्या सामन्यात खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली नाही. खेळाडूंनी खेळपट्टीवर उत्तम प्रकारे धावा घेतल्या, परंतु 15 धावांनी आमचा पराभव झाला.”