मुंबई । सचिन तेंडुलकर, विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ या दिग्गज फलंदाजांनी आपल्या बॅटच्या साहाय्याने धावांचा डोंगर उभा केला. अनेक विक्रम तयार केले. बॅट हे एक असे हत्यार आहे ज्यावर त्यांनी संपत्ती, कीर्ती आणि बरेच नाव कमावले. पण या दिग्गज खेळाडूंची बॅट तयार करणारा माणूस आज एका अत्यंत कठीण परिस्थितीत अडकला आहे. दिग्गज फलंदाजांना मदत करणारे मुंबईचे प्रसिद्ध बॅट कारागीर अशरफ चौधरी आज रुग्णालयात दाखल आहे आणि त्यांच्याकडे उपचारासाठी पैसेही नाहीत.
अशरफ भाई गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील रूग्णालयात दाखल आहेत. अशरफ कोरोना विषाणूने नव्हे तर मूत्रपिंडाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. अशरफचे हितचिंतक प्रशांत जेठमलानी, जे त्यांना गेल्या 15 वर्षांपासून ओळखतात, त्यांची काळजी आणि उपचारासाठी पैसे उभे करत आहेत.
जेठमलानी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ शी बोलतांना सांगितले की, ‘त्यांची प्रकृती ठीक नाही. लॉकडाऊनमुळे क्रिकेट सामने रद्द झाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यांच्याकडे पैसे कमवण्याचे दुसरे कोणतेही साधन नाही. आम्ही कसे बसे करून दोन लाख रुपये जमा केले आहेत, पण अजून पैशांची गरज आहे.’
अशरफ भाई यांचे मुंबईच्या मेट्रोजवळ दुकान आहे. त्याचे वडीलही हे दुकान चालवत असत. कोरोना व्हायरसमुळे दुकान बंदच राहिले आणि तिथे काम करणारे लोकही आपापल्या घरी गेले. अलीकडे अशरफनेही आपला भाऊ गमावला आहे.
अशरफचा मित्र जेठमलानी यांनी खुलासा केला की, ‘अनेक क्रिकेटर्सना अशरफचे पैसे द्यायचे आहेत. पण त्यांनी अद्याप पैसे दिले नाहीत. अशरफनेही आतापर्यंत खेळाडूंकडून पैसे मागितले नाहीत. आता अवघड प्रसंगी अशरफला मदत करण्याची आता क्रिकेटपटूंची पाळी आहे.’