शुक्रवार (२ ऑक्टोबर) रोजी इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामातील चौदावा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्सला ७ धावांनी पराभूत केले. हा हैदराबादचा या हंगामातील दूसरा विजय होता.
दरम्यान युवा फलंदाज प्रियम गर्ग हा हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरला. या १९ वर्षीय धुरंधरने ५व्या क्रमांकावर फलंदाजीला येत २६ चेंडूत नाबाद राहत ५१ धावांची तूफानी खेळी केली. यात त्याच्या ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. सोबतच त्याने अभिषेक शर्मासोबत ५व्या विकेटसाठी ७७ धावांची दमदार भागिदारी रचली. प्रियमच्या या नेत्रदिपक प्रदर्शनसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
पण अनुभवी खेळाडूंची भरमार असलेल्या चेन्नई संघाविरुद्ध एवढी चमकदार कामगिरी करणारा हा धुरंधर नक्की आहे तरी कोण, हा प्रश्न सर्वांना सतावत असेल. तसं तर, गर्गचा आयपीएलपर्यंतचा प्रवास खूप खडतर राहिला आहे. त्याच्या संघर्षाची कहानी सर्वांना प्रेरणा देणारी आहे. चला तर जाणून घेऊया…
३० नोव्हेंबर २००० रोजी उत्तर प्रदेशच्या मेरठ शहरापासून २५ किलोमीटर दूर असेलल्या किल्ला परिक्षीतगढ या गावात प्रियमचा जन्म झाला होता. त्याचे वडील नरेश गर्ग हे त्यावेळी घर चालवण्यासाठी शाळेची व्हॅन चालवत असायचे. त्यांना २ मुले आणि ३ मुली आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या कुटुंबाचा खर्च भागवणे त्यांच्यासाठी खूप अवघड काम होते.
पण त्याच्या वडिलांनी प्रियमला कधीही कोणत्याही गोष्टीची उणिव भासू दिली नाही. ते अगदी ६ वर्षांचा असल्यापासून प्रियमला क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवत असायचे. मात्र त्याच्या वडिलांकडे सुरुवातीला क्रिकेट किट विकत घेण्याइतकेही पैसे नव्हते. तेव्हा त्यांनी त्यांच्या एका मित्राकडून पैसे उधार घेत प्रियमला क्रिकेट किट आणून दिले होते.
पण पुढे प्रियम केवळ ११ वर्षांचा असताना (२०११ साली) त्याच्या आईचे निधन झाले. त्याच्या आईचे स्वप्न होते की, प्रियमने पुढे जाऊन क्रिकेटपटू बनावे. त्यामुळे आपल्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०११ पासून त्याने क्रिकेटला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे तो दररोज नित्यनियमाने ७-८ तास क्रिकेटचा सराव करु लागला. सोबतच तो शिक्षणालाही तेवढेच प्राधान्य देत असायचा. अखेर त्याच्या अथक परिश्रमाचे फळ त्याला मिळाले आणि ७ वर्षांनंतर म्हणजे २०१८ साली उत्तर प्रदेश रणजी ट्रॉफी संघात त्याची निवड झाली.
महत्त्वाचे म्हणजे, या धुरंधरने पदार्पणाच्या रणजी ट्रॉफी हंगामातच सर्वाधिक ८१४ धावा केल्या होत्या. यात गोवाविरुद्धच्या रणजी ट्रॉफी पदार्पणाच्या सामन्यात त्याने ठोकलेल्या शतकाचा समावेश होता. पुढे १९ वर्षांखालील विश्वचषकात प्रियमच्या खांद्यावर भारतीय संघाचे नेतृत्त्वपद सोपवण्यात आले होते. त्याने आपल्या नेतृत्त्वाखाली १९ वर्षांखालील भारतीय संघाला अंतिम सामन्यातदेखील पोहोचवले होते.
प्रियमने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने १२ प्रथम श्रेणी सामने खेळत ८६७ धावा केल्या आहेत. तर १९ अ दर्जाच्या सामन्यात ७०७ धावा आणि १५ देशांतर्गत टी२० सामन्यात २९० धावा नोंदवल्या आहेत. प्रियमच्या देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शनाला पाहता आयपीएल २०२०च्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद संघांनी बोली लावली होती. अखेर १.९० कोटी रुपयांना हैदराबादने त्याला ताफ्यात दाखल केले.
महत्त्वाच्या बातम्या-
यशस्वी जयस्वाल आणि धोनीच्या फोटोने घातलाय युपीतील ‘या’ जिल्ह्यात धुमाकूळ, वाचा काय आहे नक्की स्टोरी
हाल बेहाल! मॅच दरम्यान नक्की काय झालं होतं? खुद्द धोनीनेच केला खुलासा
गुणतालिकेत चेन्नई तळाशी! या खेळाडूला अतिव दुःख, म्हणतो “मला संघाला असं पाहताना दुःख होतंय, पण…”
ट्रेंडिंग लेख-
आयपीएल २०२० – पहिल्या १२ सामन्यात जबरदस्त कामगिरी करणारे टॉप ५ गोलंदाज
IPL- पॉइंट्स टेबलमधील टॉप ४ मध्ये सर्वाधिकवेळा प्रवेश करणारे ३ संघ
तुम्हाला माहितीये? ‘स्विंग का सुलतान’ असा लौकिक असलेल्या ‘या’ खेळाडूला धोनीनेच दिली होती संधी