-महेश वाघमारे
२००० नंतर भारतीय क्रिकेट टीमच्या ड्रेसिंग रूममध्ये खूप मैत्रीपूर्ण आणि हलके-फुलके वातावरण तयार झाले होते. २१ व्या शतकातील नव्या खेळाडूंचे यामध्ये मोठे योगदान होते. २० व्या शतकातील सचिन, गांगुली, कुंबळे, श्रीनाथ आणि द्रविड अशी मोजकीच वरिष्ठपण मनमिळावू मंडळी सोबतीला होती. युवराज, हरभजन, सेहवाग, नेहरा या तरुणांमुळे संघाला नवीन बळ मिळाले होते.
ड्रेसिंग रूममध्ये चेष्टा मस्करी भरपूर चालायची. कधी याची मजा घे कधी त्याची.
या सगळ्या खेळाचे सूत्रधार असायचे युवराज, हरभजन आणि सेहवाग. खोड्या काढून बाजूला व्हायचे आणि गंमत बघत बसायचे इतकेच त्यांना काम. गमतीगमतीत सौरव गांगुलीला रडवलेला किस्सा तर जगजाहीर आहे. ‘प्रॅन्कस्टार’ चा तमगा या तिकडीला मिळाला होता. अशाच एका प्रॅन्कचा आजचा किस्सा.
२००८ मध्ये गांगुली, कुंबळे निवृत्त झाले होते तर द्रविड मर्यादित षटकांच्या सामन्यापासून दूर होता. वर्षभरापूर्वी कर्णधारपदाची जबाबदारीदेखील तरुण धोनीच्या खांद्यावर दिली गेली होती. दशकाच्या सुरुवातीला युवा म्हणून संघात सामील झालेले युवराज, हरभजन ही मंडळी आता दिग्गज बनत आली होती.
त्याच वर्षी भारताने एकोणीस वर्षाखालील तरुणांचा विश्वचषक जिंकला. संघाचा कर्णधार होता विराट कोहली. एका वर्षात विश्वचषक, आयपीएल आणि घरेलू क्रिकेटद्वारे त्याने चांगले नाव कमावले आणि भारतीय संघात त्याची वर्णी लागली.
विराट ज्यावेळी प्रथम भारतीय संघात आला त्यावेळी इतर खेळाडूंना समजले की, हा सचिनला भेटायला आतूर आहे. तेव्हा खेळाडूंनी ठरवले जेव्हा सचिन पहिल्यांदा विराटला भेटेल तेव्हा याची मजा करायची. विराटच्या पहिल्या श्रीलंका दौऱ्यावेळी सचिन संघात नव्हता. त्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात येणार होता.
भारतीय संघाचे सराव शिबिर बंगलोरमध्ये होते. त्यावेळी सचिन संघात सामील झाला. विराटचा सराव सुरू होता. सचिन त्याच्या समोरून गेला तेव्हा विराटला वाटले.
” ज्या सचिनला आपण टीव्हीवर पाहत होतो तो समोर आहे. त्याच्याशी आपण काय बोलायचे? कसं बोलायचे? ”
सराव संपल्यानंतर तो बाजूला बसून हाच विचार करत होता. त्याची घालमेल हरभजन, युवराज आणि मुनाफ पटेल यांनी ओळखली. ते त्याच्या जवळ गेले आणि त्याला काय झाले असे विचारले. त्यावर विराटने त्यांना सांगितले.
” मी सचिन सरांना भेटायला उत्सुक आहे आणि तितकाच नर्वस पण. त्यांच्याशी कसं बोलावं हेच कळेना.”
त्यावर त्यांनी विराटला उपाय सांगितला. ते म्हणाले, ” नाराज नाही व्हायचं. आपल्या संघात एक नियम आहे. जो कोणी नवीन खेळाडू संघात सामील होतो त्यांनी पहिल्यांदा सचिनच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचे असतात. तू तर फलंदाज आहेस, तुला फायदा होईल आशीर्वादाचा. जा जाऊन आशीर्वाद घे.”
कोवळ्या विराटला हे म्हणणे पटले. तो चेंजिंग रूममध्ये गेला. तिथे सचिन एकटाच होता. विराटने धाडस करून सचिनला नमस्कार केला आणि आपली ओळख करून दिली. सचिन काही बोलणार त्याआधीच विराटने त्याचे पाय पकडले.
सचिन काही समजले नाही. त्याने विराटला उठवले आणि हे काय करतो असे विचारले असता. विराटने सांगितले.
” बाहेर भज्जी पा, युवी पाजी आणि मुनाफ भाई म्हटले की, आत मध्ये जाऊन सचिन सरांच्या पाया पड. तो नियम आहे.”
सचिनला हसू आवरेना. कारण, गेली ७-८ वर्ष हरभजन आणि युवराज कोणाला ना कोणाला बकरा बनवत आले होते आणि सचिन याचा साक्षीदार होता.
सचिनने विराटला सांगितले, ” तुझ्यासोबत प्रॅन्क झालाय. असा काही नियम नाही.”
त्यानंतर मुनाफ पटेल आतमध्ये आला आणि विराटला त्याचा पोपट झाल्याचे सांगितले.
पुढे, त्याच विराटने जगातील सर्व गोलंदाजांना आपल्या पाया पडायला लावले.
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स लेखमालेतील अन्य लेख-
-ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ९: खेळाडू शांत व्हायचे नाव घेत नव्हते, अखेर सुत्र सचिनने हाती घेतली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ७: …आणि १८ वर्षांचा विराट पडला सचिनच्या पाया
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ४: …अगदी ठरवुन त्यांनी गांगुलीला रडवले
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ५- त्यादिवशी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये निवडणूक झाली
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग ३: दादा गुडनाईट बोलून निघून गेला परंतू युवराज मात्र पूरता घाबरला
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग २: लक्ष्मणच्या अंघोळीने थांबला होता चालू कसोटी सामना
–ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १: सेहवाग रडत होता तर जॉन राईट शेजारच्या खोलीत सिगरेट ओढत होते