कोरोना मुळे लांबलेल्या या हंगामात फुटबॉल क्लब बार्सिलोनाला कोणत्याच स्पर्धेचे विजेतेपद मिळवता आले नाही. लॉकडाऊनच्या आधी ला लीगा मध्ये पहिल्या स्थानावर असलेल्या बार्सिलोनाला लॉकडाऊन नंतर आपले ते स्थान सुद्धा टिकवता आले नाही आणि रियाल माद्रिद ने विजेतेपद पटकावले.
बार्सिलोना साठी या हंगामाचा शेवट गोड करण्याची एकमेव संधी होती आणि ती म्हणजे चॅम्पियन्स लीग चे विजेतेपद. २०१५ नंतर संघाला चॅम्पियन्स लीग जिंकण्यात अपयश आले होते आणि या वर्षी सुद्धा परत इतिहासाची पुनरावृत्ती झाली आणि बार्सिलोनाला बायर्न कडून ८-२ ने पराभव स्विकारावा लागला. या पराभवानंतर किके सेटियन या बार्सिलोनाच्या मॅनेजरला घरचा रस्ता दाखवण्यात येईल हे जवळपास निश्चितच होते.
पण त्या आधीच बार्सिलोना साठी सर्वात मोठी धक्कादायक बातमी आली. बातमी होती बार्सिलोना संघाचा स्टार लियोनेल मेस्सीची क्लब सोडायची तयारी. या बातमी नंतर लगेच आज बार्सिलोना बोर्ड च्या सर्व सदस्यांची बैठक झाली आणि त्यांनी मॅनेजर सेटियन यांची आजच हकालपट्टी केली.
सेटियन नंतर कोण? झ्यावी आणि रोनाल्ड कुमन यांची नावे बार्सिलोनाच्या मॅनेजर पदासाठी चर्चेत होती. जानेवारी महिन्यातच झ्यावीने बार्सिलोनाला नकार दिल्याने आणि कुमन यांनी अनेक वेळा बार्सिलोना ला प्रशिक्षण देण्याची इच्छा बोलून दाखवल्याने त्यांचे नाव जास्त चर्चेत आले आणि त्यांच्याच नावावर येत्या २ दिवसात शिक्कमोर्तब होईल. याआधी कुमन नेदरलॅंड संघाचे २०१८ पासून मॅनेजर होते. त्यांनी आयाक्स, वॅलेंसिया, एवर्टन या संघाचे मॅनेजर पद सांभाळले आहे.
बार्सिलोना संघाने या वर्षात २ प्रशिक्षकांना काढले आहे. या आधी एखाद्या हंगामाच्या मध्ये मॅनेजरला काढण्याची वेळ बार्सिलोना संघावर २००३ साली आली होती क्लबने लुईस वॅन गाल यांना काढले होते. तब्बल १७ वर्षानंतर क्लबवर ही वेळ पुन्हा आली जेव्हा त्यांनी या वर्षी जानेवारी मध्ये वॅलवर्डेला काढले. पण अवघ्या १० महिन्यात पुन्हा त्यांना नवीन मॅनेजर शोधावा लागला.
कुमन यांनी खेळाडू म्हणून सुद्धा बार्सिलोना तर्फे उत्तम कामगिरी केली आहे.
त्यांची बार्सिलोना मधील कामगिरीची आकडेवारी:-
२६४ सामने
१४९ विजय ५६ बरोबरीत ५९ पराभव
८८ गोल्स
२५ फ्री किक गोल
१० विजेतेपद ( ४ ला लिगा, १ चॅम्पियन्स लीग, १ कोपा डेल रे, ३ स्पॅनिश सुपर कप, १ युएफा सुपर कप)