कुठलाही संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर किंवा ऑस्ट्रेलिया संघही दुसऱ्या देशात दौऱ्याला गेल्यावर स्लेजिंग हे होतंच. ऑस्टलियाचे खेळाडू नेहमीच स्लेजिंगसाठी ओळखले जातात. त्यामुळे अनेकदा विरोधी खेळाडूसुद्धा शांत न बसता चोख प्रत्युत्तर देतात. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचं स्लेजिंगचे किस्से काही नवीन नाही. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सुद्धा असे किस्से घडले आहेत. असाच एक किस्सा २००८ च्या दौऱ्यात सिडनी कसोटीमध्ये घडला. अँड्र्यू सायमंड्स आणि हरभजन सिंग यांच्यात त्यावेळी झालेला वाद बराच गाजला होता. हरभजनला पेनल्टी सुद्धा लावण्यात आलेली, पण नंतर ते आरोप मागे घेण्यात आले.
भारतीय संघ २००८ साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर (India Tour Of Australia) असताना सिडनीमध्ये कसोटीचा तिसरा दिवस सुरु होता. कठीण परिस्थितीमध्ये हरभजन सिंग (Harbhajan Singh) फलंदाजी करत होता. ऑस्ट्रेलियाचा अँड्रयू सायमंड्स (Andrew Symonds) त्याला मोठा फटका मारण्यासाठी उकसवत होता. त्यामुळे हरभजनने त्याला प्रत्त्युत्तर दिले.
त्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगने (Ricky Ponting) पंचांकडे याची तक्रार केली. ही तक्रार वांशिक टिप्पणीबद्दल करण्यात आली होती. पॉन्टिंग म्हणाला हरभजनने ‘मंकी’ म्हणजे माकड असं सायमंड्सला म्हणाला. आयसीसीच्या नियमांप्रमाणे वांशिक टिप्पणी हा लेव्हल ३ चा गुन्हा मानला जातो. तिसरा दिवस संपल्यावर यावर सुनावणी झाली आणि हरभजनला दोषी ठरवून तीन सामन्यांमधून त्याला बाद करण्यात आलं.
परंतु, भारतीय खेळाडूंनी या निर्णयाविरुद्ध एकजूट होऊन त्याला विरोध केला. भारतीय संघाने सांगितलं की जर हरभजनवर केलेले आरोप मागे घेतले नाही, तर आम्ही हा दौरा रद्द करून मायदेशी परतू. हा वाद वाढताना दिसला त्यामुळे आयसीसीने (ICC) याची सुनावणी न्यूझीलंडचे जज जॉन हेन्सनकडे सोपवली. जज जॉन हेन्सनने सगळ्या सुनावणीनंतर सांगितलं हरभजन वरचे आरोप निराधार आहे आणि हरभजन या आरोपांतून सहज सुटला.
भारताचा या सामन्यात १२२ धावांनी दारुण पराभव झाला. अँड्र्यू सायमंड्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. त्याने पहिल्या डावांत १६२ तर दुसऱ्या डावांत ६१ धावा केल्या होत्या. यासोबतच त्याने ३ विकेट्स सुद्धा घेतल्या. त्यामुळे सायमंड्सच्या अष्टपैलू कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली. तसंच हरभजन सिंगने सुद्धा या सामन्यात चांगलं प्रदर्शन केलं. त्याने दोन्ही डावांत मिळून ४ विकेट्स घेतल्या आणि पहिल्या डावांत ६३ आणि ७ धावा केल्या.
व्हिडिओ पाहा – विरोधी संघातील गोलंदाजांना Golden Watches भेट देणारा Captain