पुणे, 9 जुलै 2023: पीवायसी हिंदु जिमखाना तर्फे आयोजित दुसऱ्या पीवायसी रावेतकर फुटबॉल लीग स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात अंतिम फेरीत गार्डीयन संघाने शिल्ड संघाचा टायब्रेकरमध्ये 3-1 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
बाऊन्स फिटनेस अँड स्पोर्टस क्लब येथील मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत 14 वर्षाखालील गटात अंतिम फेरीच्या सामन्यात दोन्ही संघांनी सुरुवातीला तोडीस तोड खेळ केला. दुसऱ्याच मिनिटाला शिल्डच्या ओजस नाईकने गोल नोंदवून संघाचे खाते उघडले. त्यानंतर पिछाडीवर असलेल्या गार्डीयनच्या ईशान लागु, संवित कासट यांनी अफलातून चाली रचल्या, पण शिल्डच्या गोलरक्षकाने त्या परतावून लावल्या. पूर्वार्धात शिल्डकडे 1-0 अशी आघाडी कायम होती.
उत्तरार्धात मात्र, गार्डीयनच्या आघाडीच्या फळीने आपली आक्रमणाची धार अधिक तीव्र केली. 16व्या मिनिटाला संवित कासटने दिलेल्या पासवर ईशान लागुने गोल करून संघाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर दोन्ही संघांनी जोरदार प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यामुळे टायब्रेकर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकरमध्ये गार्डीयन कडून संवित कासट, असिम देवगावकर यांनी गोल केले, तर शिल्डकडून अगस्त्य कुंटे, ओजस नाईक, आनंदी बेडेकर, ऋषभ बेडेकर यांना गोल मारण्यात अपयश आले.
स्पर्धेतील विजेत्या गार्डीयन संघाला करंडक, तर उपविजेत्या शिल्ड संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदु जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, नॉर्थ इस्ट युनायटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार ताम्हाणे, रावेतकर ग्रुपच्या आदिती रावेतकर आणि क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक अभिषेक ताम्हाणे, नंदन डोंगरे, अभिषेक भागवत, सिध्दार्थ दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:14 वर्षाखालील गट:
गार्डीयन: 3(ईशान लागु 16मि., संवित कासट, असिम देवगावकर.)(गोल चुकविला: अथर्व इंगळहळीकर, विहान कोठारी) टायब्रेकरमध्ये वि.वि.शिल्ड: 1(ओजस नाईक 2मि.,)(गोल चुकविला: अगस्त्य कुंटे, ओजस नाईक, आनंदी बेडेकर, ऋषभ बेडेकर); सामनावीर – ईशान लागु.
इतर पारितोषिके:
गोल्डन बुट विजेता: अगस्त्य कुंटे (10गोल)
बेस्ट डिफेंडर: अथर्व इंगळहळीकर
गोल्डन ग्लोव्ह विजेता: ऋषभ बेडेकर
प्लेअर ऑफ द टुर्नामेंट: संवित कासट.
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाच जिंकणार ODI World Cup, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी, ‘या’ खेळाडूला म्हटले हुकमी एक्का
रिषभ पंतचे ग्राउंडवर कमबॅक! खास सामन्यासाठी हार्दिक पंड्यासोबत लावली हजेरी