टी २० क्रिकेटची लोकप्रियता दररोज वाढताना दिसत आहे. टी २० क्रिकेटमध्ये तुफानी फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना प्रेक्षक डोक्यावर घेतात. जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये टी २० क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. युवा आणि अनुभवी असे सर्व खेळाडू एकत्र या स्पर्धांमध्ये खेळताना दिसतात.
क्रिकेटमध्ये टी २० प्रकार आल्याने जागतिक क्रिकेटमध्ये एक नवीन क्रांती झाली. यामुळे, खेळाला प्रसिद्धी मिळण्यास वेळ लागला नाही. टी२० क्रिकेट सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षातर या प्रकारातील विश्वचषक आयोजित करण्याचा आयसीसीचा निर्णयही अत्यंत प्रभावी ठरला.
या क्रिकेट प्रकारामुळे फलंदाजांनाही वेगाने खेळण्याची सवय झाली आहे. काही फलंदाजांनी तर टी २० क्रिकेटमध्ये शतक ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर टी२० क्रिकेटमध्ये शतके ही सर्वात मोठी गोष्ट आहेच. पण या क्रिकेट प्रकारात अशी काही अशी नावे आहेत, ज्यांना आक्रमक खेळाडू मानले जाते पण आतापर्यंत त्यांच्या फलंदाजीतून आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये एकही अर्धशतक आलेले नाही. या लेखात यापैकी तीन प्रमुख खेळाडूंचा उल्लेख केला आहे.
टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक न झळकावणारे ३ फलंदाज
ख्रिस लिन
हा ऑस्ट्रेलियन खेळाडू आपल्या तुफानी खेळीसाठी ओळखला जातो. याने विविध टी २० स्पर्धेमध्येही आपला जलवा दाखवला आहे आणि मोठे डाव खेळले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर १८ टी२० सामने खेळल्यानंतरही त्याने अर्धशतक केलेले नाही. १८ टी२० सामन्यात २९१ धावा करणारा ख्रिस लिन याच्या नावावर सर्वाधिक ४४ धावा आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १३२ आहे. ख्रिस लिनने आयपीएलमध्येही अनेक स्फोटक खेळी साकारल्या आहेत.
आंद्रे रसेल
इतर टी २० स्पर्धेत वेस्ट इंडीजचा तुफानी अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने तुफानी खेळी केल्या आहेत, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची फलंदाजी जबरदस्त झालेली नाही. ४९ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत त्याने त्याच्या फलंदाजीच्या जोरावर ५४० धावा केल्या असून ४७ ही त्याची सर्वोच्च धावांची खेळी आहे. आंद्रे रसेलने अनेक वेळा आयपीएल आणि सीपीएलमध्ये स्फोटक डाव खेळला आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला तशी कामगिरी करता आली नाही.
बेन स्टोक्स
इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सनेही टी २० आंतरराष्ट्रीयमध्ये अर्धशतक ठोकलेले नाही. बेन स्टोक्सने अनेक टी २० स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. स्टोक्सने आतापर्यंत २६ आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ३०५ धावा केल्या आहेत. यात त्याच्या सर्वाधिक ४७ धावांची नोंद आहे. यामध्ये बेन स्टोक्सचा स्ट्राइक रेट १३४ आहे, जो चांगला मानला जाऊ शकतो.