-दिपक बाबर
सुरुवातीला क्रिकेट हा संथ खेळ मानला जात होता. कसोटी क्रिकेटमध्ये दिवसांना मर्यादा नव्हती. मात्र त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही बदल होत गेले. काळानुसार क्रिकेटही बदलले आहे. कसोटी क्रिकेट नंतर वनडे क्रिकेट आले आणि मग टी२० तर अगदी कमी काळात खूप लोकप्रिय झाले. कसोटी क्रिकेटचा खेळ हा संथ मानला जात असे परंतु असे बरेच खेळाडू होते ज्यांचा खेळ पाहिल्यावर त्याची प्रचिती येत नव्हती. त्यांची बॅट प्रत्येक प्रकारामध्ये तळपत असायची.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काही खेळाडू होऊन गेले, ज्यांना आपण कोणत्या प्रकारात खेळत आहोत, याचा कोणताच फरक पडत नव्हता. त्यांचा आपला खेळण्याचा अंदाज होता, ज्यामुळे अनेकदा गोलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागत असे. या फलंदाजांची स्वत:ची वेगळी शैली होती आणि बिनधास्तपणे खेळण्याचा अंदाज होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे अनेक बिनधास्त खेळणारे खेळाडू होऊन गेले. वेगवान गोलंदाज असो किंवा फिरकीपटू, त्यांच्यावर हे फलंदाज तुटून पडायचे. कसोटी क्रिकेट असो किंवा मर्यादित षटकांचा सामना, त्यांची बॅटही तशीच तळपत होती. त्यामुळेच कदाचित प्रेक्षकांनीही या फलंदाजांना विशेष प्रेम आणि आदर दिला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अशा तीन फलंदाजांचा उल्लेख येथे करण्यात आला आहे. जे कोणत्याही गोलंदाजाला घाबरत नव्हते नेहमी ताबडतोब खेळी करायचे.
क्रिकेट जगतातील हे ३ फलंदाज जे नेहमी बिनधास्तपणे खेळले.
सर विवियन रिचर्ड्स
वेस्ट इंडिजचे तत्कालीन खेळाडू सर विवियन रिचर्ड्स (Sir Vivian Richards) यांनी गोलंदाजांचे कधीच वर्चस्व राहू दिले नाही. कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज बचावात्मक पवित्रा ठेवत खेळायचे, त्यावेळी रिचर्ड्स मात्र वेगवान खेळी करायचे. त्यांना गोलंदाजांची किंवा इतर कशाचीही पर्वा नव्हती. त्यांचा फक्त बॅट चालवण्यावर भर होता. त्यांनी कसोटीत ८५४० धावा आणि वनडे सामन्यात ६७२१ धावा केल्या.
ख्रिस गेल
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस गेल (Chris Gayle) हा तुफानी फलंदाज क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारामध्ये धमाका करायचा. गेलने टी२० क्रिकेटमध्ये ज्याप्रकारे वादळ निर्माण केले त्याचप्रमाणे वनडे आणि कसोटीमध्ये सुद्धा दरारा निर्माण केला होता. टी२० मध्ये त्याने आरसीबीकडून आयपीएलमध्ये नाबाद १७५ धावांची केलेली ताबडतोब खेळी आजही सर्वांच्या स्मरणात आहे. त्याचे कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतकही आहेत. बर्याचदा गेलचा जाग्यावर उभे राहूनच षटकार मारण्यावर भर असायचा. गेल हा वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाज या दोघांनाही तसेच फटाके मारायचा. त्याच्यासाठी दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांची केवळ धुलाई करणे हेच अंतिम लक्ष्य असायचे.
विरेंद्र सेहवाग
भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) या महान खेळाडूने जगातील दिग्गज वेगवान गोलंदाज आणि महान फिरकीपटूचा अगदी सहजतेने सामना करत त्यांची धुलाई केली. क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात त्याने बिनधास्तपणे फलंदाजी केली. सेहवागने दोनदा कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावले. याशिवाय त्याच्या नावावर वनडेमध्ये द्विशतकही आहे. त्याला खेळपट्टीशी आणि हवामानाविषयी काही देणेघेणे नव्हते. फलंदाजी करताना तो मैदानाच्या प्रत्येक भागांत फटके मारायचा.
ट्रेंडिंग लेख-
-सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये शतक करणारे ५ क्रिकेटपटू
–सोशल मीडियावर सर्वाधिक चलती असलेले ५ भारतीय क्रिकेटर, पहा कोण आहे तिसऱ्या क्रमांकावर
–दोस्ती! एकत्र सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या जगातील ५ जोड्या, दोन आहेत भारतीय