इंग्लंडविरुद्ध भारताने पहिल्या वनडे सामना जिंकला. जवळपास सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कृणाल पंड्या आणि प्रसिद्ध कृष्णाने जबरदस्त कामगिरी केली.
भारताच्या संघाने ५ गडी गमावत ३१७ अशी मोठी धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ३४.१ षटकांत २५१ धावांत गडगडला. एकवेळ असे वाटत होते की, इंग्लंडचा संघ सहज जिंकेल. पहिल्या गड्यासाठी जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोने १३५ धावा जोडल्या. मात्र, या फलंदाजांना बाद केल्यावर मधल्या फळीतील फलंदाज काही खास कामगिरी करण्यात अपयशी ठरले आणि भारताने विजय संपादन केला.
भारतीय संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला असला तरी, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात बदल होणे निश्चित आहेत. दोन खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यामुळे हे बदल करण्यात येतील. दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळेल, याविषयी आपण जाणून घेऊ.
१) रोहित शर्माच्या जागी शुबमन गिल
भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर व उपकर्णधार रोहित शर्मा हा दुसऱ्या वनडे सामन्यात खेळण्याविषयी साशंकता निर्माण झाली आहे. टी२० मालिकेत दमदार फॉर्ममध्ये असलेल्या रोहितने पहिल्या सामन्यात केवळ २८ धावा बनविल्या. यादरम्यान मार्क वूडच्या गोलंदाजीवर तो दुखापतग्रस्त झाला. या मालिकेनंतर आयपीएल खेळली जाणार असल्याने, तो जोखीम घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे तो उर्वरित मालिकेत खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
रोहित दुसऱ्या सामन्यात न खेळल्यास त्याच्या जागी युवा शुबमन गिलला संधी दिली जाऊ शकते. गिलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका वठवली होती.
२) श्रेयस अय्यरच्या जागी सूर्यकुमार यादव
मागील दीड वर्षापासून भारतीय संघात चौथ्या क्रमांकाची जागा पक्की करणारा मुंबईचा श्रेयस अय्यर हा उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याचा खांदा निखळला व त्यामुळे तो पुढील २ महिने क्रिकेट खेळू शकणार नाही. या पार्श्वभूमीवर त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर दुसऱ्या खेळाडूला संधी मिळणे निश्चित आहे.
श्रेयसच्या जागी चौथ्या क्रमांकावर दुसरा मुंबईकर सूर्यकुमार यादव खेळेल. तो या सामन्यातून आपले वनडे पदार्पणदेखील करेल. सूर्यकुमारने मागील आठवड्यातच टी२० पदार्पण करून आपल्या फटकेबाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
३) कुलदीप यादवच्या जागी युजवेंद्र चहल
जवळपास वर्षभरापासून संघाबाहेर असलेल्या चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने पहिल्या सामन्यातून पुनरागमन केले होते. मात्र, त्याचे हे पुनरागमन त्याच्या आणि भारतीय संघाच्या मनासारखे झाले नाही. भारताने विजय मिळवला असला तरी कुलदीप संघाचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ९ षटकात ६८ धावा लुटविल्या.
कुलदीपच्या जागी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला पाचारण केले जाऊ शकते. तोदेखील टी२० मालिकेत महागडा ठरला होता. मात्र, अनुभव व तो सध्या जास्त क्रिकेट खेळला असल्याने संघ व्यवस्थापन त्याला पुन्हा एक संधी देऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
INDvENG: श्रेयश अय्यर वनडे मालिकेतून बाहेर; दुसऱ्या सामन्यात ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी
कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारत पाठविणार मोठे पथक? कोरोना नाही तर ‘हे’ आहे कारण