सध्याच्या काळात अनेक देशात क्रिकेट खेळले जाते आणि पाहिले देखील जाते. हळूहळू या खेळाने जगभरात लोकप्रियता मिळवली. क्रिकेट चाहत्यांचे हित लक्षात घेऊन वेळोवेळी क्रिकेटचे नवे प्रकार जोडले गेले. प्रथम कसोटी प्रकार खेळवला गेला, नंतर एकदिवसीय प्रकार आला आणि सर्वात शेवटी टी२० प्रकार आला. टी२० हा सध्या खेळाडू आणि प्रेक्षकांचा आवडता प्रकार बनला आहे. आजकाल सर्व देश आपापल्या देशात टी२० लीग आयोजित करतात, ज्यामध्ये विविध देशांचे खेळाडू सहभागी होतात.
अनेक वर्षांपूर्वी आयसीसी आणि विविध क्रिकेट बोर्ड अशा प्रकारच्या स्पर्धा एकत्र आयोजित करत असत, ज्यामध्ये अनेक देशांचे महान खेळाडू एकत्र खेळत असत. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांचे आवडते खेळाडू एकाच संघात खेळताना पाहायला मिळायचे. मात्र, आजकाल इतकं क्रिकेट खेळलं जातंय की प्रेक्षकांना कदाचित त्या स्पर्धांचा विसर पडला असेल. पूर्वी फारसे क्रिकेट खेळले जात नव्हते. त्यामुळे या स्पर्धा वेळोवेळी आयोजित केल्या जात होत्या.
आज या लेखात आपण अशा तीन स्पर्धांबद्दल बोलणार आहोत, ज्या पुन्हा सुरू केल्या, तर क्रिकेट चाहत्यांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
१. आयसीसी सुपर सीरीज
सन २००५ साली ऑस्ट्रेलियात आयसीसी सुपर सीरीज नावाची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ही मालिका त्यावेळचा पहिल्या क्रमांकाचा संघ ऑस्ट्रेलिया आणि उर्वरित देशांतील अव्वल खेळाडूंची वर्ल्ड इलेव्हन यांच्यात खेळली गेली होती. या मालिकेत ३ वनडे आणि एक कसोटी सामना खेळला गेला. वर्ल्ड इलेव्हन संघाला या स्पर्धेत एकही सामना जिंकता आला नाही आणि ऑस्ट्रेलियाने सर्व सामने सहज जिंकले. आयसीसीने ही स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, ही स्पर्धा पुन्हा आयोजित करण्यात आली नाही.
२. चॅम्पियन्स लीग टी२० स्पर्धा
चॅम्पियन्स लीग टी२० स्पर्धेची घोषणा २००८ मध्ये करण्यात आली होती. या स्पर्धेची पहिली आवृत्ती २००९ मध्ये खेळवली गेली होती. या स्पर्धेत जगभरातील टी२० लीगचे अव्वल संघ सहभागी होत असत. ही स्पर्धा बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. या स्पर्धेची शेवटची आवृत्ती २०१४ मध्ये खेळवली गेली होती. ही स्पर्धा चेन्नई सुपर किंग्सने जिंकली होती. या स्पर्धेत जगभरातील अव्वल संघांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. मात्र, प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद असल्याने ही स्पर्धा रद्द करण्यात आली.
३. आफ्रो आशिया स्पर्धा
आफ्रो आशिया स्पर्धा २००५ मध्ये पहिल्यांदा खेळली गेली. ही स्पर्धा आफ्रिका इलेव्हन आणि आशिया इलेव्हन यांच्यात खेळली गेली. या स्पर्धेला आयसीसीनेही मान्यता दिली होती. या स्पर्धेतील सामन्यांना एकदिवसीय सामन्यांचा दर्जा देण्यात आला. आशिया क्रिकेट परिषद आणि आफ्रिका क्रिकेट परिषदेसाठी निधी उभारणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेचे केवळ दोन हंगाम झाले. पहिल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये बरोबरी झाली. २००७ मध्ये, या स्पर्धेत ३ एकदिवसीय सामने तसेच एक टी२० सामना खेळवला गेला होता. या मालिकेतील सर्व सामने आशिया इलेव्हनने जिंकले. मात्र, प्रसारकांशी वाद आणि इतर समस्यांमुळे ही स्पर्धा नंतर रद्द करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
ले पंगा! टी२० विश्वचषकातील अशा ५ घटना, ज्यामुळे निर्माण झाले वाद
लक्ष्मणच्या दिमतीला येणार फ्लिंटॉफ-स्टार्क-हेजलवूडला घडवणारा दिग्गज; औपचारिक घोषणा बाकी
मनिष पांडेचा सुपर ओव्हरमध्ये विजयी षटकार; कर्नाटकसह हे संघ उपांत्य फेरीत दाखल