वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्या दोन दशकांत शानदार प्रदर्शन केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियापाठोपाठ सर्वात यशस्वी संघ आहे. कपिल देव ते सौरव गांगुली आणि एमएस धोनी यांनी नेतृत्व क्षमता चांगली दाखवून भारतीय संघाच्या यशासाठी मोठा हातभार लावला. सध्या भारतीय संघाचा विचार जगभर केला जातो. चांगल्या आणि सातत्याने खेळणार्या खेळाडूंच्या जोरावर भारतीय संघाने यशाची नवीन उंची गाठली आहे.
भारतीय संघात वनडे क्रिकेटचे अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले. यापैकी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव पहिले येते. संघाच्या विजयात त्याने बर्याचदा हातभार लावला आहे. विश्वचषक जिंकण्याचे सचिनचे स्वप्न होते, जे शेवटी पूर्ण झाले. सचिनच्या काळापासून अनेक खेळाडूंनी सतत वनडे क्रिकेटमध्ये एक उत्तम खेळ दाखविला आहे. या सर्व खेळाडूंबद्दल या लेखात जाणून घेणार आहोत. यात सलग सर्वाधिक वनडे सामने खेळणार्या भारतीय संघातील तीन खेळाडूंचा उल्लेख आहे.
भारतीय संघात सतत सर्वाधिक वनडे खेळलेले खेळाडू-
३. विराट कोहली (Virat Kohli)
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये सातत्याने सर्वाधिक सामने खेळणार्या भारतीयांच्या यादीत तिसरे स्थान मिळविले आहे. २०१० ते २०१४ या कालावधीत त्याने भारतासाठी सलग १०२ वनडे सामने खेळले. त्याने ४५५२ धावा केल्या आणि २२ अर्धशतकांव्यतिरिक्त १७ शतके ठोकली. या सामन्यांमध्ये २०११ च्या वर्ल्ड कप फायनलचा समावेश आहे.
२. मोहम्मद अझरुद्दीन (Mohammad Azharuddin)
माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन सलग सर्वाधिक वनडे सामने खेळणार्या खेळाडूंच्या यादीत दुसर्या स्थानावर आहे. १९९१ पासून ते १९९७ पर्यंत त्याने १२६ वनडे सामने खेळले. त्यात त्याने २७ अर्धशतक केले परंतु एकही शतक करता आले नाही. अझरनेही ३७७४ धावा केल्या. मॅच फिक्सिंग घोटाळ्यानंतर त्याची कारकीर्द संपली.
१. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
वनडे क्रिकेटमधील जवळपास प्रत्येक विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. भारतासाठी सर्वाधिक सलग वनडे सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. १९९० मध्ये करिअर सुरू केल्यानंतर सचिन तेंडुलकरने सलग आठ वर्षे म्हणजेच १९९८ पर्यंत सलग १८५ वनडे सामने खेळले. यावेळी त्याच्या बॅटने ६६२० धावा आल्या. या काळात सचिनने १५ जबरदस्त शतके ठोकली.