fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताचे ‘हे’ ३ अभागी खेळाडू ज्यांना अचानकच संघातून दाखवला बाहेरचा रस्ता

विशेष म्हणजे या तीनही खेळाडूंकडे क्रिकेट खेळण्यासाठी आवश्यक कौशल्य मोठ्याप्रमाणावर होते. तसेच त्यांनी वेळोवेळी चांगल्या खेळाचे प्रदर्शन देखील केले होते.

क्रिकेट खेळणारा प्रत्येक खेळाडू स्वतःच्या उराशी एक स्वप्न बाळगून असतो. एकदिवस तरी राष्ट्रीय संघातून देशासाठी खेळायचे, हे ते स्वप्न असते. प्रत्येक क्रिकेटपटू या स्वप्नासोबतच क्रिकेट खेळायला सुरुवात करतो आणि त्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतो.

भारत हा एक असा देश आहे, जिथे मोठ्या संख्येने खेळाडू क्रिकेटसाठी स्वतःचे आयुष्य वाहत असतात. मात्र, यातील प्रत्येक खेळाडूचे राष्ट्रीय संघात खेळण्याचे स्वप्न पुर्ण होतेच, असे नाही. यापैकी काही जणांना राष्ट्रीय संघात प्रतिनिधीत्व करायला मिळते. तर बाकी काही खेळाडू हे रणजीपर्यंत मजल मारतात. तर काही फक्त एखाद्या क्लबपुरते मर्यादीत राहतात.

राष्ट्रीय संघात निवड झालेल्या खेळाडूला मोठ्या कालावधीपर्यंत संघात क्रिकेट खेळावे. त्यातही विश्वचषकात देशाचे प्रतिनिधीत्व करावे, असे वाटते. यात देखील काही खेळाडू यशस्वी होतात, तर काहींच्या पदरी तितके यश येत नाही.

या लेखात मात्र आपण असे खेळाडू पाहणार आहोत. ज्यांना राष्ट्रीय संघात स्थान मिळाले होते. परंतु, त्यानंतर अचानकच त्यांना संघाबाहेर काढण्यात आले. तसेच त्यानंतर ते पुन्हा कधीच संघात दिसले नाहीत. भारताच्या या खेळाडूकडे प्रचंड कौशल्ये होते. मात्र, अनिश्चित कारणामुळे त्यांना संघाबाहेर ठेवण्यात आले. त्यानंतर ते अद्याप संघात पुनरागमन करु शकले नाहीत.

क्रमांक – 3

  • अंबाती रायडू

आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यांनतर अंबाती रायडूचे राष्ट्रीय संघात आगमन झाले होते. रायडूला संघात चौथ्या स्थानावर खेळवण्यात आले होते. त्यानंतर रायडूने स्वतःच्या कौशल्याच्या जोरावर संघातील चौथे स्थान जवळपास पक्के केले. त्यामुळे 2019 च्या विश्वचषकात त्याला घेतले जाईल, अशी खात्री होती. परंतु, अचानकच निवड समितीकडून त्याचे नाव काढण्यात आले आणि त्याऐवजी विजय शंकरची निवड करण्यात आले.

विश्वचषक स्पर्धेत रायडूला संघाबाहेर ठेवण्यात आल्यानंतर, तो पुन्हा कधीच संघात दिसला नाही. रायडूने त्यानंतर काही दिवसात क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. मात्र, थोड्या दिवसांनी त्याने आपला हा निर्णय मागे घेतला. मात्र, सध्या त्याचे संघातील पुनरागमन अवघड मानले जात आहे.

क्रमांक – 2

  • करुण नायर

करुण नायर हा असा एकमेव भारतीय खेळाडू आहे, ज्याने विरेंद्र सेहवागनंतर कसोटीमध्ये त्रिशतक झळकावले होते. ही कामगिरी त्याने त्याच्या तिसऱ्याच कसोटी सामन्यात इंग्लंड संघाविरुद्ध केली होती. त्यानंतर नायरकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. त्याला 2017 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आले. मात्र, तिथे करुण नायरची कामगिरी अगदीच सुमार झाली होती. त्यामुळे त्यानंतर त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले.

करुणला त्यानंतर इंग्लंड विरुद्धच्या एका मालिकेसाठी निवडण्यात आले. मात्र, प्रमुख अकरा खेळाडूमध्ये त्याला संधी देण्यात आली नाही. त्या संपुर्ण मालिकेत भारतीय फलंदाजांनी ढिसाळ कामगिरी झाली होते. त्यामुळे मालिकेदरम्यान अचानक हनुमा विहारीला बोलावण्यात आले. मात्र, संघात असूनही करुण नायरला मैदानाबाहेरच ठेवण्यात आले होते.

यानंतर वेस्ट इंडीज विरुद्धच्या मालिकेत करुण नायरला डावलण्यात आले. तेव्हापासून नायर संघाबाहेरच आहे. त्याने आजपर्यंत फक्त 6 कसोटी सामने खेळले आहे, ज्यात त्याने 374 धावा केल्या आहेत. तसेच २ वनडे सामने खेळण्याची त्याला संधी मिळाली तर टी२०मध्ये मात्र टीम इंडियाकडून तो एकही सामना खेळू शकला नाही.

क्रमांक – 1

  • प्रज्ञान ओझा

प्रज्ञान ओझा हा भारताचा असा अभागी खेळाडू आहे, ज्याने त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात 10 बळी घेऊनही त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले. त्याने नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्धच्या सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या. हा सामना सचिन तेंडुलकरचा देखील शेवटचा सामना होता. मात्र, सचिनसह तेव्हापासून आजपर्यंत प्रज्ञान ओझा देखील संघाबाहेरच राहिला आहे.

प्रज्ञान ओझाने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र, महत्वाची बाब म्हणजे जबरदस्त क्रिकेट कौशल्य असूनही ओझाला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. काही दिवसांपुर्वीच प्रज्ञान ओझाने एक विधान केले होते. ज्यात त्याने, “आपल्यासोबत निवड समिती सदस्यांनी कधीही चर्चा केली नव्हती आणि आपल्याला अचानकच संघाबाहेर काढले होते” असे म्हटले.

You might also like