मुंबई । पंजाबच्या पठाणकोट येथे क्रिकेटर सुरेश रैनाच्या नातेवाईकांवर हल्ला करणार्या मारेकऱ्यांचा पंजाब पोलिसांना सुगावा लागला आहे. बुधवारी पंजाब पोलिसांनी याप्रकरणी 3 आरोपींना अटक केली. प्रसार माध्यमांच्या माहितीनुसार, हे तिघे आंतरराज्य दरोडेखोर आणि गुन्हेगारांच्या टोळीचे सदस्य आहेत. मात्र, या प्रकरणात आणखी 11 आरोपींचा पोलीसांना शोध लागलेला नाही. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याचे पंजाब पोलिसांनी सांगितले आहे.
क्रिकेटपटू सुरेश रैना बुधवारी प्रथमच पठाणकोटमधील थरियाळ गावात आपल्या नातेवाईकांच्या हत्येनंतर पोहोचला. पठाणकोटला पोहोचताच सुरेश रैनाने या प्रकरणावर दु: ख व्यक्त केले. येथे प्रसार माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, ‘पंजाब पोलीस चांगले काम करीत आहेत. आम्हाला मदत केल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो.’
19 ऑगस्ट रोजी याच गावात सुरेश रैना याचे मामा (आत्याचे पती) अशोक कुमार आणि त्याचा आतेभाऊ कौशल यांचा खून झाला होता. तर त्याच्या आत्याला आणि तिच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना गंभीर दुखापती झाल्या होत्या.
रैना यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांकडे न्याय मागितला
कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी रैनाने पंजाब पोलिस व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली. रैनाने पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना टॅग करत लिहिले होते, ‘त्या रात्री काय घडले आणि कोणी केले हे आजपर्यंत आम्हाला ठाऊक नाही. मी पंजाब पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करतो. कमीतकमी आम्हाला हे जाणून घेण्याचे अधिकार आहेत की त्यांच्याबरोबर हे भयंकर कृत्य कोणी केले? या गुन्हेगारांना सोडले जाऊ नये.’
टेरेसवर झोपले होते हे कुटुंब
वास्तविक, पठाणकोटच्या थरियाळ गावात मध्यरात्री सुरेश रैना यांच्या नातेवाईकांवर हल्ला झाला. हा हल्ला 19 ऑगस्ट रोजी रात्री घराच्या छतावर कुटुंबिय झोपलेले असताना झाला. त्यानंतर लुटण्याच्या उद्देशाने अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.