२०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून रोहित शर्मा भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडत आहे. अचानक मिळालेल्या या संधीचे त्याने सोने केले आहे. २०१३ ते आत्तापर्यंत सलामीवीर म्हणून रोहितची सरासरी ५८.११ इतकी जबरदस्त आहे. त्याच्या खालोखाल असलेला हाशिम आमला हा त्याच्यापेक्षा १० गुणांनी मागे आहे. यावरूनच रोहित शर्माच्या यशस्वितेची कल्पना आपल्याला येईल.
रोहितच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये तीन द्विशतके आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. गेली अनेक वर्ष शिखर धवनसोबत त्याची सलामीवीर म्हणून विशेष जोडी जमलेली आपण पाहतो.
अजून २ वर्षांनी रोहितने वयाची पस्तिशी पार केली असेल. तेव्हा त्याचा उत्तराधिकारी कोण? याचा शोध सुरू होईल. आपण आज अशा तीन खेळाडूंविषयी जाणून घेऊया जे रोहित शर्मा नंतर त्याचा वारसा समर्थपणे पुढे नेतील.
पृथ्वी शॉ
रोहितप्रमाणेच मुंबईकर असलेला पृथ्वी शॉ या जागेसाठी आपली दावेदारी करू शकतो. २०१८ च्या एकोणीस वर्षाखालील युवा विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार राहिलेल्या पृथ्वीमध्ये सचिन आणि सेहवाग यांच्या खेळाची झलक दिसते असे अनेक जाणकार सांगतात.
पृथ्वीने २०१८ साली भारताकडून पदार्पण केले आहे. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावून भारतीय संघाचे भविष्य उज्वल असल्याची ग्वाही दिली होती. आयपीएलमध्ये देखील त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी उत्तम कामगिरी बजावली आहे.
पृथ्वीने आत्तापर्यंत भारतासाठी ३ कसोटी व ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. शालेय स्तरावरून नाव कमावलेल्या पृथ्वीने रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी आणि कसोटी पदार्पणात शतक झळकावण्याचा सचिन तेंडुलकर याच्या विक्रमाची बरोबरी केली होती.
शुबमन गिल
२०१८ च्या युवा विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवलेला गिल हा देखील या यादीमध्ये समाविष्ट आहे. गिल हा प्रामुख्याने तिसऱ्या अथवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. परंतु, आयपीएलमध्ये आपल्या कोलकाता नाईट रायडर्स या संघासाठी सलामीवीराची भूमिका पार पडतं त्याला पाहिले आहे.
गिल हा आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. रोहित शर्माप्रमाणेच तो थंड डोक्याने खेळू शकतो तसेच रोहितसारखे त्याच्या भात्यात अनेक फटके सुद्धा आहेत. ज्याद्वारे, विरोधी गोलंदाजांवर तो हुकूमत गाजवून शकतो.
शुबमन गिलने आतापर्यंत भारतासाठी दोन एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. २०१९ च्या देवधर ट्रॉफी स्पर्धेमध्ये शुबमनने भारत क संघाचे नेतृत्व केले होते. २०१९ च्या आयपीएलचा उदयन्मुख खेळाडू म्हणून त्याची निवड झाली होती.
रिषभ पंत
सध्या भारतीय क्रिकेट संघात आपल्या जागेसाठी संघर्ष करत असलेला रिषभ पंत सुद्धा रोहित शर्माच्या जागेवर दावेदारी दाखल करू शकतो. नैसर्गिक आक्रमक असलेला हा यष्टीरक्षक फलंदाज सलामीवीर म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतो.
रिषभने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत जास्तीत जास्त सामने मधल्या फळीत खेळले आहेत. परंतु, त्याच्या अवेळी विकेट टाकण्याच्या सवयीमुळे त्याला अनेकदा टीकेचा धनी व्हावे लागते. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत रिषभ ची कामगिरी दमदार राहिली आहे. २०१८ च्या रणजी सत्रात त्याच्याच नेतृत्वाखाली दिल्ली संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.
२३ वर्षाच्या खेळाडूने आत्तापर्यंत भारतासाठी १३ कसोटी, १६ वनडे व २८ टी२० सामने खेळले आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारतातर्फे कसोटीत शतके ठोकणारा तो एकमेव यष्टीरक्षक फलंदाज आहे. २०१८ आयपीएल मध्ये सर्वोत्कृष्ट उदयन्मुख खेळाडूचा पुरस्कार रिषभने पटकावला होता.