पुणे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर टुर्नामेंट समितीतर्फे आयोजित ३१ वी अखिल भारतीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल हॉकी स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. शुक्रवार, दिनांक ३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत स्पर्धा होणार आहे. हॉकी इंडियाच्या मान्यतेने स्पर्धा होत आहे. अशी माहिती स्पर्धा संयोजन समितीचे सचिव शरद रोच यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी स्पर्धा समितीचे प्रमुख नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे, लिनो जॉन, महेंद्र निकाळजे, किसन गलेल्लु, धनंजय देशमुख, वसंत मोरे उपस्थित होते. स्पर्धेत २८ संघांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये पुण्यातून १४ संघ असणार आहेत. तसेच चंदीगढ, भोपाळ, मध्यप्रदेश, ओरीसा, बिहार, हैदराबाद, गुजरात, बेळगाव, अमरावती, औरंगाबाद, धुळे, सोलापूर या ठिकाणाहून १४ संघ सहभागी झाले आहेत.
शरद रोच म्हणाले, खुल्या गटात ही स्पर्धा होणार असून बाद पद्धतीने सामने होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. यावेळी महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे उपस्थित राहणार आहेत. विजेत्या संघाला रु.५० हजारचे पारितोषिक, चषक, पदक आणि प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. तर द्वितीय क्रमांकास रु. ३० हजार आणि तृतीय क्रमांकास रु. २० हजार चषक, पदक आणि प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. यासोबतच वैयक्तिक पारितोषिके दिली जाणार असून सर्वोत्तम गोलकीपर, सर्वोत्तम बचाव, आक्रमक खेळाडू, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत.