हल्दवानी; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राला सांघिक सेबर्स प्रकारात सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. चुरशीची लढतीत सेनादलाकडून महाराष्ट्राचा पराभव झाला. वैयक्तिक सेबर्स प्रकारात आदित्य अनगळने कांस्यपदकाची कमाई केली.
चौखाम्बा हॉलमध्ये संपलेल्या तलवारबाजीतील सांघिक सेबर्स प्रकारात सेनादलाने महाराष्ट्राला 45-38 गुणांनी नमवले. महाराष्ट्रासाठी अभय शिंदे, आदित्य अनगळ, धनंजय जाधव निखिल वाघ यांनी अंतिम लढतीत लक्षवेधी खेळ केला. वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेतील विजेता संघ असलेल्या महाराष्ट्राने 32-32 गुणापर्यत बरोबरी सामन्यात रंगत आणली होती. अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्र मागे पडल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
आदित्य अनगळने वैयक्तिक सेबर्स प्रकारामध्ये नेत्रदीपक कामगिरी करत कास्यपदक संपादन केले. साखळी सामन्यांमध्ये आघाडी असलेल्या आदित्यला उपांत्य लढतीत सेनादलाच्या जुबराज याने 15-9 गुणाने पराभूत केले. विजेत्यांचे राज्य तलवारबाजी संघटनेचे सचिव डॉ. उदय डोंगरे, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश काठोळे , तलवारबाजी संघाचे व्यवस्थापक शेषनारायण लोंढे, प्रशिक्षक राजू शिंदे अजय त्रिभुवन स्वामी पियर शिल्पा नेने आनंद वाघमारे सौरभ तोमर यांनी अभिनंदन केले आहे.