२००८ मध्ये सुरू झालेली इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा आहे. दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेमध्ये केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी खेळाडूंनासुद्धा चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. केवळ आयपीएलमुळे अनेक खेळाडूंना त्यांच्या देशातील राष्ट्रीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. आयपीएलमधून बरेच खेळाडू रातोरात हिरो बनले. जगभरातील बहुतेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले आहेत.
या स्पर्धेमध्ये असे अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत ज्यांना बरीच संधी मिळाली, अनेक दिग्गजांना तर कर्णधारपदाचा सन्मानही मिळाला. पण यातील काही दिग्गज क्रिकेटपटू कर्णधार आणि खेळाडू म्हणून अपयशी झाले आहेत. म्हणूनच या लेखात त्या ४ दिग्गज खेळाडूंबद्दल सांगणार आहोत जे खेळाडू आणि कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये फ्लॉप झाले.
४. युवराज सिंग (Yuvraj Singh)
आयपीएलच्या पहिल्या सत्रात युवराजसिंग किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता आणि त्याच्या नेतृत्वात संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. परंतु, पहिल्या सत्रानंतर आयपीएलमध्ये त्याला कर्णधारपदी फारसे काही करता आले नाही आणि त्याशिवाय, केवळ दोन मोसमात तो संघाचा कर्णधार होता.
आपल्या १२ वर्षांच्या आयपीएल कारकीर्दीत, युवराज सिंगने आयपीएलमध्ये दोन संघाचे नेतृत्व केले. पहिल्या दोन सत्रात तो किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार होता, त्यानंतर २०११ मध्ये तो पुणे वॉरियर्स इंडियाचा कर्णधार होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करुनही युवी आयपीएलमध्ये फ्लॉप ठरला. युवराजने आपला शेवटचा आयपीएल हंगाम २०१९ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता, तिथेही त्याची कामगिरी काही खास नव्हती. युवराजने आयपीएलमध्ये १३२ सामने खेळले असून त्यामध्ये त्याने २४.७७ च्या सरासरीने २७५० धावा केल्या आहेत.
युवराजने ४३ सामन्यात नेतृत्व केले. त्यातील २१ सामन्यात त्याच्या नेतृत्वाखालील संघाला विजय मिळवता आला तर २१ वेळा पराभवाचा सामना करावा लागला. १ सामन्याचा निकाल लागला नाही.
३. अँजेलो मॅथ्यूज (Angelo Mathews)
श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज देखील आयपीएलमध्ये फ्लॉप झालेल्या खेळाडूंपैकी एक आहे. मॅथ्यूज आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स इंडिया आणि दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळला आहे.
त्याने ४९ आयपीएल सामन्यांत केवळ ७२४ धावा केल्या असून गोलंदाजीत त्याने केवळ २७ विकेट घेतल्या आहेत. मॅथ्यूजसाठी २०१० आयपीएलचा सर्वोत्कृष्ट हंगाम ठरला आणि त्याने २०१७ मध्ये आयपीएलमधील शेवटचा सामना खेळला.
२०१० च्या मोसमात त्याने १४ सामन्यात २३३ धावा करून गोलंदाजीत आठ विकेट्सही घेतल्या. त्याशिवाय आयपीएलच्या इतर कोणत्याही मोसमात श्रीलंकेचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू फारशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही. तसेच त्याने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडिया संघाचे ५ सामन्यात नेतृत्वही केले. पण त्याच्या नेतृत्वाखाली पुणे संघाला केवळ १ विजय मिळवता आला तर ४ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
२. कुमार संगकारा (Kumar Sangakkara)
या यादीमध्ये कुमार संगकाराचे नाव येणे म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे. पण आयपीएलमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून संगकाराची नोंद तितकी प्रभावी नाही. संगकाराने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि डेक्कन चार्जर्सचा कर्णधार म्हणून काम पाहिले.
श्रीलंकेसाठी कर्णधार म्हणून चांगली कामगिरी असूनही आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून संगकाराला फारसे यश मिळवता आले नाही. त्याचबरोबर हा महान फलंदाज आणि यशस्वी यष्टिरक्षक कुमार संगकारा देखील आयपीएलमध्ये फलंदाज म्हणूनही सुपर फ्लॉप ठरला आहे.
कुमार संगकाराने आयपीएलमध्ये ७१ सामने खेळले असून त्यामध्ये त्याने २५.९५ च्या सरासरीने १६८७ धावा केल्या आहेत. तसेच संगकाराने आयपीएलमध्ये एकूण ४७ सामन्यात नेतृत्व केले. त्यातील केवळ १५ सामन्यात त्याच्या नेतृत्वाखालील संघाला यश मिळाले तर ३० वेळा पराभवाची चव चाखायला लागली. २ सामने बरोबरीत सुटले.
१. सौरव गांगुली (Sourav Ganguly)
माजी भारतीय कर्णधार आणि जगातील दिग्गज फलंदाज सौरव गांगुलीसुद्धा आयपीएलमध्ये अपयशी ठरला आहे. सौरव गांगुली २००८ ते २०१० या काळात आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. गांगुली कोलकाता संघाचा कर्णधारही होता.
२०११ मध्ये लिलाव होण्यापूर्वी केकेआरने त्याला सोडले आणि त्यानंतर कोणत्याही संघाने त्याला लिलावात विकत घेतले नाही. परंतु, मधल्या मोसमात पुणे वॉरियर्स इंडियाने आशिष नेहराचा पर्याय म्हणून सौरव गांगुलीचा संघात समावेश केला.
गांगुलीने आयपीएलमधील अखेरचा सामना २०१२ मध्ये पुणे वॉरियर्सकडून खेळला होता. कर्णधार आणि फलंदाज म्हणून गांगुलीला आयपीएलमध्ये काही खास करता आले नाही. आयपीएल कारकिर्दीत दादाने ५९ सामन्यांत १०६.८० च्या स्ट्राईक रेटने १३४९ धावा केल्या. तसेच त्याने ४२ सामन्यात नेतृत्वही केले. यात त्याला १७ सामन्यात विजय मिळाला तर २५ सामन्यात पराभव पत्करावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील संघांना दुबईमध्ये पोहोचल्यानंतर इतके दिवस राहावे लागणार आहे क्वारंटाइन
जाणून घ्या रोहित शर्माची पहिली कमाई किती होती आणि ती कशी खर्च केली ?
…म्हणून सोशल मीडियावर विराट कोहलीची केली जात आहे चेष्ट
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष: अफाट लोकप्रियतेचा धनी ठरलेला पण तितकाच वादग्रस्त जेसी रायडर
आयपीएल २०२० – यंदा यूएईमध्ये हे ५ गोलंदाज जिंकू शकतात पर्पल कॅप
चौथ्या क्रमांकानंतर फलंदाजीला येत २५ ओव्हरच्या आत शतक करणारे जगातील २ अवलिया क्रिकेटर