क्रिकेटच्या मैदानावर मोठमोठ्या गोलंदाजांना आपल्या फलंदाजीने घाम आणणाऱ्या रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा सर्वोत्कृष्ट खेळाडू समजले जाते. वनडेत रोहितच्या नावावर ३ द्विशतके आणि २९ शतकांची नोंद आहे. तर, टी२० क्रिकेटमध्ये ४ शतके जडणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.
हा हिटमॅन २० षटकांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आहे. आयपीएलमध्येही त्याने एका शतकाच्या आणि ३६ अर्धशतकांच्या मदतीने ४८९८ धावा केल्या आहेत. पण, नेहमी आपल्या बॅटने मैदानावर षटकार-चौकरांचा वर्षाव करणारा रोहित आयपीएलच्या काही गोलंदाजांपुढे मात्र लवकरच बाद होतो. या गोलंदाजांनी रोहितला आयपीएलमध्ये कित्येकदा तरी पव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
या लेखात, आयपीएलमधील त्याच ४ गोलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे. तर बघूयात, कोण आहेत ते ४ गोलंदाज…
या चार गोलंदाजांपुढे रोहित शर्माची फलंदाजी पडते फिकी (4 IPL Bowlers Who Always Became Tough For Rohit Sharma) –
ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) –
मुंबई इंडियन्सचा कट्टर विरोधी असलेल्या चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा प्रमुख गोलंदाज ड्वेन ब्रावोने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५ वेळा रोहित शर्माला बाद केले आहे. २००८पासून आयपीएलचा भाग असणाऱ्या ब्रावोला २०११मध्ये सीएसके संघात प्रवेश मिळाला. तेव्हापासून त्याला सीएसकेचा मॅच विनर खेळाडू म्हणून ओळखले जाऊ लागले.
रोहितसाठी नेहमी डोकेदुखी ठरणाऱ्या ब्रावोने आयपीएलमध्ये अष्टपैलू भूमिका बजावली आहे. त्याने आतापर्यंत १३४ सामने खेळत १४७ विकेट्स घेतल्या आहेत. तर, १०२ डावात फलंदाजी करताना १४८३ धावाही केल्या आहेत.
सुनिल नारायण (Sunil Narine) –
वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नारायण हा आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. रोहित शर्माविरुद्धची त्याची गोलंदाजी आकडेवारीही उल्लेखनीय आहे. या दमदार गोलंदाजांने आतापर्यंत रोहितला आयपीएलमध्ये ६वेळा तंबूचा रस्ता दाखवला आहे.
२०१२ साली नारायणने केकेआर संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो केकेआरचा भाग आहे. दरम्यान त्याने ११० सामने खेळत १२२ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. तर, ५७ डावात फलंदाजीची जबाबदारी सांभाळत नारायणने ७७१ धावा केल्या आहेत.
विनय कुमार (Vinay Kumar) –
गेल्या काही हंगामांमध्ये रोहितला सर्वाधिक त्रास देणाऱ्या आयपीएल गोलंदाजांमध्ये विनय कुमारचा देखील समावेश आहे. पण, सुदैवाने २०१९पासून तो आयपीएलचा भाग नाही, त्यामुळे रोहितसाठी ही आनंदाची बातमी आहे. विनयने २००८ पासून ते २०१८पर्यंत आयपीएलमध्ये रोहितला ६ वेळा बाद केले आहे.
२०१२ आणि २०१३ या दोन्ही हंगामातील विनयचे गोलंदाजी प्रदर्शन दमदार राहिले होते. २०१२मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून १५ सामने खेळत त्याने १९ विकेट्स पटकावल्या होत्या. तर, २०१३मध्येही त्याने आरसीबी संघाकडून खेळताना १६ सामन्यात २३ विकेट्स घेतल्या होत्या. या दोन्ही हंगामात तो आय़पीएलमध्ये सर्वाधिक धावा घेणारा पाचवा गोलंदाज बनला होता.
अमित मिश्रा (Amit Mishra) –
दिल्ली कॅपिटल्सचा स्टार गोलंदाज अमित मिश्रापुढेही रोहितची फलंदाजी फिकी पडते. २०१५पासून दिल्ली संघाचा नियमित सदस्य असलेला मिश्रा यंदाही रोहितच्या रस्त्यातील काटा बनताना दिसेल. त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत रोहितला ६वेळा बाद केले आहे. आतापर्यंत मिश्राने दिल्लीकडून ९२ आयपीएल सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने ९७ विकेट्स पटकावल्या आहेत.
३७ वर्षीय मिश्राच्या नावावर आयपीएलमध्ये ३ वेगवेगळ्या संघांकडून हॅट्रिक घेण्याच्या शानदार विक्रमाची नोंद आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स आणि सनराइजर्स हैद्राबाद या ३ वेगवेगळ्या संघांकडून खेळताना आयपीएलमध्ये हॅट्रिक घेतली होती. तर त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये १४७ सामने खेळत १५७ विकेट्स घेतल्या आहेत.