आयसीसी टी२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर विराट कोहलीने टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता शुक्रवारी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून देखील हटविण्यात आले आहे. त्याच्या ऐवजी रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद देण्यात आले. याचा अर्थ असा की, येणाऱ्या २०२३ विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसेल. आता अनेकांना प्रश्न पडला असेल की, विराटला कर्णधार पदावरून काढून का टाकले? चला तर पाहूया, यामागील प्रमुख कारणे.
यात काहीच शंका नाहीये की, विराट कोहली सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ पैकी १५ मालिकांमध्ये विजय मिळवला होता. यापैकी मायदेशात त्याने ९ पैकी ८ मालिका आपल्या नावावर केल्या. परंतु त्याला आयसीसीची एकही स्पर्धा जिंकता आली नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. परंतु, त्यांना जेतेपद पटकावता आले नाही. त्यामुळेच कदाचित हा मोठा निर्णय घेण्यात आला असावा.
रोहित शर्माला काही दिवसांपूर्वीच टी२० संघाचे कर्णधारपद देण्यात आले. त्यानंतरच असे वाटू लागले होते की, लवकरच वनडे संघाचे कर्णधारपद देखील रोहितलाच मिळणार आहे. मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद एकाच खेळाडूकडे असते. तर कसोटी संघासाठी दुसरा कर्णधार असतो. ही रणनिती इंग्लंड , ऑस्ट्रेलिया सारखे संघ वापरतात. याच रणनीतीचा वापर केल्यामुळे विराटला कर्णधारपद गमवावे लागले असावे.
सतत बायो बबलमध्ये राहून संघाचे नेतृत्व करणे सोपी गोष्ट नाहीये. विराट कोहलीने अनेकदा हा गोष्टींचा उल्लेख केला आहे. तीन स्वरूपात संघाचे नेतृत्व करत असल्याचा परिणाम त्याच्या फलंदाजीवर दिसून येत होता. गेल्या २ वर्षांपासून त्याला शतक देखील झळकावता आले नाहीये. वनडे आणि टी२० संघाचे कर्णधारपद गेल्यानंतर तो आता मोकळेपणाने फलंदाजी करू शकेल.
विराट कोहलीला कर्णधार पदावरून काढण्यामागे, नव्या प्रशिक्षकांचा देखील हात असू शकतो. काही दिवसांपूर्वीच राहुल द्रविडला संघाचे मुख्य प्रशिक्षक पद देण्यात आले आहे. कदाचित त्याला नवीन संघासह कर्णधार देखील नवीन हवा असेन.
महत्वाच्या बातम्या :
ब्रेकिंग! दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाची घोषणा, रहाणेची उपकर्णधारपदावरुन गच्छंती
साजिद खानने बांगलादेशी फलंदाजांची पळता भुई थोडी, पाकिस्तानचा दुसरी कसोटी जिंकत मालिकेवर कब्जा