हरियाणा येथे संपन्न झालेल्या “४६व्या कुमार/कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत मुलामध्ये हरियाणा, मुलींमध्ये साई संघाने अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या अंतिम सामन्यात हरियाणाने साईचा प्रतिकार २८-१९ असा मोडून काढत गतवर्षाची पुनरावृत्ती केली. मध्यांतराला ११-१३अशा २गुणांनी पिछाडीवर पडलेल्या हरयाणाने उत्तरार्धात जोरदार कमबॅक करीत विजयश्री खेचून आणली. साईला उत्तरार्धात आपला प्रभाव पाडता आला नाही.
मुलींच्या अंतिम सामन्यात मात्र साईने चुरशीच्या लढतीत उत्तर प्रदेशचे कडवे आव्हान ३६-३२ असे मोडून काढत विजय मिळविला. विश्रांतीला ११-२०अशा ९ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या साईने विश्रांतीनंतर जोरदार आक्रमण करीत या विजयाला गवसणी घातली.
महाराष्ट्राने मात्र या स्पर्धेत निराशा केली. दोन्ही संघाना उपांत्यपूर्व फेरीत साईकडून हार पत्करावी लागली. मुलांमध्ये साईने महाराष्ट्राला ३७-३१ असे, तर मुलींमध्ये साईने महाराष्ट्राला ३४-१९ असे नमवित आगेकूच केली. महाराष्ट्राच्या दोन्ही संघाना या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही.