क्रिकेटचा कोणताही प्रकार पाहिला तरी द्विशतक करणे तसे अवघडच. कसोटीमध्ये आत्तापर्यंत १९४ वेळा २०० पेक्षा अधिक धावा फलंदाजांना करता आल्या आहेत. तर वनडेत ८ वेळा खेळाडूंनी २०० धावांचा टप्पा पार केला आहे. यात एकट्या रोहित शर्माने ३वेळा हा कारनामा केला आहे. याबरोबरच त्याने वनडेत सर्वाच्च धावांची खेळी करण्याची कामगिरीही केली.
त्याने १३ नोव्हेंबर २०१४ ला कारकिर्दीतील दुसरे द्विशतक श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे खेळताना केले. त्यावेळी त्याने १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने २६४ धावांची खेळी केली होती.वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती.
हा विक्रम अजूनतरी कोणाला मोडता आलेला नाही. विशेष म्हणजे रोहित व्यतिरिक्त अजून कोणत्याच फलंदाजाला वनडे २४० धावाचा टप्पा पार करता आलेला नाही. पण असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे रोहितचा हा विक्रम मोडण्याची क्षमता आहे.
अशा ५ खेळाडूंचा घेतलेला हा आढावा –
५. ऍरॉन फिंच – ऑस्ट्रेलियाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज ऍरॉन फिंचने आत्तापर्यंत अनेक स्फोटक खेळी केल्या आहेत. विशेष म्हणजे टी२० क्रिकेटमध्येही द्विशतकाजवळ पोहचणारा तो फलंदाज आहे.
त्याने वनडेत १२६ सामन्यात ४१.०२ च्या सरासरीने ४८८२ धावा केल्या आहेत. यात त्याने १६ शतके केली आहेत. त्यात त्याने २ वेळा १५० धावांचा टप्पा पार केला आहे. एवढेच नाही तर त्याने टी२०मध्ये ३ वेळा १५० धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे जर त्याने टी२० प्रमाणे वनडेत आक्रमक खेळ केला तर तो रोहितचा विक्रम मोडू शकतो.
४. विराट कोहली – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडेही रोहितच्या सर्वोच्च धावांचा विक्रम मोडण्याची क्षमता आहे. विराटने आत्तापर्यंत वनडेत ४३ शतके केली आहेत. यात त्याने ४ वेळा १५० धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याची १८३ धावा ही सर्वोच्च वनडे खेळी आहे. त्याने ही खेळी २०१२ ला पाकिस्तानविरुद्ध १४८ चेंडूत केली होती.
तसेच विराटकडे सातत्य तर आहेच, पण तो एकदा स्थिर झाल्यावर त्याला बाद करण्यासाठी गोलंदाजांना मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे तोही रोहितचा विक्रम मोडू शकतो. विराटने वनडेत आत्तापर्यंत २४८ सामन्यात ५९.३३ च्या सरासरीने ११८६७ धावा केल्या आहेत.
३. मार्टिन गप्टिल – न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टील हा जगातील स्फोटक फलंदाजांपैकी एक समजला जातो. त्याने वनडेत ४२.५० च्या सरासरीने आत्तापर्यंत ६८४३ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १६ शतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तो रोहितनंतर वनडेत सर्वोच्च धावांची खेळी करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंंदाज आहे.
त्याने २०१५ च्या विश्वचषकात नाबाद २३७ धावांची खेळी देखील केली होती. तसेच त्याआधी त्याने २०१३ ला इंग्लंड विरुद्धही नाबाद १८९ धावांची खेळी केली होती. त्यामुळे त्याच्याकडे रोहितचा विक्रम मोडण्याची नक्कीच क्षमता आहे.
२. जेसन रॉय – इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयचीही आक्रमक फलंदाजांमध्ये गणना होते. २०१५ ला वनडेमध्ये पदार्पण केलेल्या रॉयने आत्तापर्यंत ८७ वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने ९ शतकांसह ४२.३९ च्या सरासरीने ३४३४ धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे त्याने केलेल्या ९ शतकांपैकी त्याने ३ वेळा १५० धावांचा आकडा पार केला आहे. त्याने मेलबर्नला ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याच्या वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च १८० धावांची खेळी केली होती. त्याने १५१ चेंडूत १६ चौकार आणि ५ षटकारांसह ही खेळी केली होती. तो जर अशाच आक्रमकतेने पुढे खेळत राहिला तर तोही रोहितचा सर्वोच्च धावांचा विक्रम मोडू शकतो.
१. डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने आत्तापर्यंत १२३ वनडेत १८ शतकांसह ४५.८० च्या सरासरीने ५२६७ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने केलेल्या १८ शतकांपैकी ६ वेळा त्याने १५० धावांचा टप्पा पार केला आहे.
तो सर्वाधिकवेळा वनडेत १५० धावांचा टप्पा पार करणारा रोहितनंतरचा दुसरा क्रिकेटपटू आहे. तसेच त्यातील ३ वेळातर त्याने १७० धावांचा टप्पाही पार केला आहे. त्याची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या ही १७९ आहे. ही खेळी त्याने पाकिस्तानविरुद्ध २०१७ ला १२८ चेंडूत केली होती. त्यामुळे त्याची फलंदाजीतील आक्रमकता पाहिली तर तो नक्कीच रोहितचा विक्रम मोडू शकतो.
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटमधील त्या विक्रमाला ३५ वर्ष झाली, आजही आहे त्याच भारतीय खेळाडूच्या नावावर