आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा असे दिसून आले आहे की एखादा खेळाडूचे जन्मभूमी वेगळ्या देशात असते आणि तो खेळतो दुसऱ्या देशाकडून. युरोपियन युनियन (ई.यू.) देशांसाठी कोलपाक करारही आहे. यामध्ये खेळाडू कोणत्याही युरोपियन संघामध्ये परदेशी खेळाडू म्हणून क्रिकेट खेळू शकतात. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या अनेक खेळाडूंचे लक्ष इंग्लंडसारख्या संघाकडून खेळण्याकडे असते. तसेच अनेकदा इंग्लंड संघात विविध देशांत जन्मलेले खेळाडू खेळताना दिसून येतात.
क्रिकेट इतिहासात आतापर्यंत असे २७ खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन देशांचे प्रतिनिधित्व केले आहे. यातील काही क्रिकेटपटू क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये २ देशांकडून खेळले आहेत तर काहींनी केवळ वनडे आणि टी-२० मध्ये किंवा फक्त एका स्वरूपात २ देशांचे प्रतिनिधित्व केले आहे.
दोन किंवा अधिक देशांचे प्रतिनिधित्व करणारे पाच प्रसिद्ध क्रिकेटपटू –
१. डर्क नॅन्स (Dirk Nannes) – नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियामध्ये जन्मलेला क्रिकेटपटू डर्क नॅन्सने नेदरलँड्सकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि २००९ मध्ये आयसीसी टी२० विश्वचषकात त्याने नेदरलँड संघाचे प्रतिनिधित्व केले. दोन महिन्यांनंतर त्याला ऑस्ट्रेलियन संघाकडून संधी मिळाली आणि स्कॉटलंडविरुद्ध ऑगस्ट २००९ मध्ये झालेल्या वनडे मालिकेत त्याने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले.
आयसीसी टी२० विश्वचषक २०१० मध्ये या वेगवान गोलंदाजाचा ऑस्ट्रेलियाच्या संघातदेखील समावेश होता. एकूणच त्याने नेदरलँड्सकडून दोन टी२० आणि ऑस्ट्रेलियासाठी १५ टी-२० आणि एक वनडे सामना खेळला आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने २०१६ मध्ये अखेरचा स्पर्धात्मक सामना खेळला होता.
२. इयन मॉर्गन (Eoin Morgan) – आयर्लंड आणि इंग्लंड
आयर्लंडमध्ये जन्मलेला क्रिकेटपटू इयन मॉर्गनने गेल्या वर्षी (२०१९) आपल्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाला विश्वचषक जिंकून देत इतिहास रचला होता. इंग्लिश संघासाठी त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. २००९ मध्ये त्याने इंग्लंडकडून पदार्पण केले होते, परंतु त्याआधी तो आयर्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी खेळत होता.
२००६ मध्ये, मॉर्गनने आयर्लंड संघासाठी पहिला सामना खेळला. २००७ च्या विश्वचषकामध्ये मॉर्गन आयर्लंड संघाचा भाग होता. आयर्लंडकडून त्याने २३ वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्याने इंग्लंडकडून १६ कसोटी सामने आणि २१३ वनडे सामने खेळले आहेत.
३. केपलर वेसेल्स (Kepler Wessels) – दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही देशांकडून केपलर वेस्सल खेळले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर या दोन राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणारे ते एकमेव क्रिकेटपटू आहेत. वेसेल्सने १९८२ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून कारकीर्दीची सुरुवात करत त्यांच्यासाठी २४ कसोटी सामने खेळले. त्यानंतर ते १९८९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत स्थलांतरित झाले. परंतु वर्णभेदामुळे आफ्रिकेमध्ये क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली. परंतु, नंतर १९९१ मध्ये ही बंदी काढून टाकली गेली आणि त्यांना दक्षिण आफ्रिकेमधून वनडे तसेच कसोटी क्रिकेटमध्येही खेळण्यास परवानगी देण्यात आली.
१९९२ च्या विश्वचषकामध्ये वेल्सल्स यांची कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली होती. त्यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी १६ कसोटी सामने आणि ५५ वनडे सामने खेळले. १९९४ मध्ये क्रिकेटमधून त्यांनी निवृत्ती घेतली.
४. ल्यूक रोन्ची (Luke Ronchi) – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड
माजी क्रिकेटपटू ल्यूक रोन्चीचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला आणि ऑस्ट्रेलियामध्ये लहानाचा मोठा झाला. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने ४ कसोटी सामने, ८५ वनडे आणि ३३ टी-२० सामने खेळले आहेत. त्याची विस्फोटक फलंदाजी मर्यादित षटकांच्या स्वरूपासाठी योग्य होती आणि म्हणूनच त्याला कसोटीत स्थान मिळवता आले नाही.
२००७-०८ मध्ये तो वेस्ट ऑस्ट्रेलियाकडून खेळाला. त्याला लवकरच ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात स्थान मिळाले. कारकीर्दीतील चौथ्या वनडे सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाकडून वेगवान अर्धशतक ठोकले. त्याने कारकिर्दीची आशादायक सुरुवात केली होती. परंतु लवकरच त्याचा फॉर्म गेला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने त्याला संघात स्थान दिले नाही.
त्यानंतर रोन्चीने आपल्या जन्म देशासाठी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि त्याला लवकरच न्यूझीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात निवडले गेले. फलंदाज आणि यष्टीरक्षक असल्याने न्यूझीलंडसाठी तो एक महत्वाचा खेळाडू बनला.
तो २०१५ च्या विश्वचषकात न्यूझीलंड संघाचा सदस्य होता. त्याने २०१७ मध्ये शेवटची आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धा खेळली आणि निवृत्तीची घोषणा केली.
५. अब्दुल हफीज कारदार (Abdul Hafeez Kardar) – भारत आणि पाकिस्तान
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाकडून अब्दुल हाफिज कारदार हे कसोटी क्रिकेट खेळले. १९४६ मध्ये इंग्लंड दौर्यावर त्यांनी तीन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले.
१९४७ मध्ये भारत-पाकिस्तान विभाजनानंतर, कारदार पाकिस्तानमध्ये स्थायिक झाले आणि १९५२ मध्ये पाकिस्तानकडून भारताविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले.
१९५२ ते १९५८ पर्यंतच्या पाकिस्तानच्या पहिल्या २३ कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाचे नेतृत्व केले.
वाचनीय लेख –
मॅच-फिक्सिंगच्या आरोपामुळे बंदी घालण्यात आलेले ५ दिग्गज भारतीय क्रिकेटपटू
सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीने बाद केलेले ३ फलंदाज…
शेवटी सचिन वैतागून म्हणाला, दादा टॉसला जा!