एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक नेहमीच नवीन प्रतिभावान खेळाडूंची खाण म्हणून ओळखला जातो. विराट कोहली, रोहित शर्मा, सनथ जयसुर्या, ब्रायन लारा, युवराज सिंग असे अनेक दिग्गज याच स्पर्धेत पहिल्यांदा चमकले होते. तसेच सध्याचा भारतीय टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा सुद्धा २००६ च्या एकोणीस वर्षाखालील विश्वचषकातच पहिल्यांदा नावारूपास आला होता. २००६ च्या एकोणीस वर्षाखालील विश्वचषकामध्ये रोहित शर्माबरोबर खेळलेले बरेच खेळाडू नंतर भारतीय संघासाठी सुद्धा खेळले. अशा काही खेळाडूंची आपण माहित घेऊ.
शाहबाज नदीम
शाहबाज नदीम हा झारखंडचा अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. नदीमने रोहित शर्मासोबत २००६ एकोणीस वर्षाखालील विश्वचषकामध्ये स्कॉटलंडविरुद्ध एक सामना खेळला होता. कुलदीप यादवला दुखापत झाल्याने ३० वर्षीय नदीमला भारतासाठी पहिली कसोटी खेळण्याची संधी २०१९ मध्ये मिळाली. नदीमने त्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चार बळी घेतले.
इशांत शर्मा
इशांत शर्मा हा सध्या भारतीय वेगवान गोलंदाजीचा कणा आहे. इशांत शर्माचा २००६ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक संघात समावेश होता, परंतु त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. इशांतने भारतासाठी १०४ कसोटी सामने, ८० एकदिवसीय सामने आणि १४ टी२० खेळले आहेत.
पियुष चावला
पियुष चावला हा नावाजलेला भारतीय फिरकी गोलंदाज आहे. चावलाने २००६ एकोणीस वर्षाखालील विश्वचषकामध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक बळी (१३) घेतले होते. चावला फक्त १८ वर्षाचा असताना, त्याने भारतासाठी पहिली कसोटी खेळला. परंतु, चावला भारतासाठी जास्त खेळू शकला नाही. चावलाने भारतासाठी तीन कसोटी सामने आणि २५ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
रवींद्र जडेजा
भारतीय संघातील फिरकी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा २००६ एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात चार सामने खेळलेला आहे. जडेजाने या चार सामन्यात चार बळी घेतले होते. परंतु त्याला फलंदाजीमध्ये फक्त ३४ धाव जमा करता आल्या. जडेजा सध्या भारतीय संघाचा क्रमांक एकचा अष्टपैलू खेळाडू आहे.
चेतेश्वर पुजारा
पुजारा हा भारतीय कसोटी संघांचा एक अनुभवी फलंदाज आहे. २००६ एकोणीस वर्षाखालील विश्वचषकामध्ये पुजाराने सर्वाधिक धावा केल्या होत्या. पुजाराने सहा सामन्यात ११६.३३ च्या सरासरीने ३४९ धाव जमवल्या होत्या. त्यानंतर पुजाराने २०१० मध्ये भारतासाठी पहिली कसोटी खेळली. सध्या पुजाराची न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिकेत उपकर्णधार म्हणून निवड झाली आहे.