भारताच्या अनेक खेळाडूंनी वनडे क्रिकेटमध्ये मागील काही वर्षात शानदार कामगिरी केली आहे. वनडेत पहिले द्विशतक करणारा सचिन तेंडूलकरही भारतीय आहे. तर तीन वनडे द्विशतके करण्याचा विश्वविक्रम करणारा रोहित शर्माही भारतीय आहे. विशेष म्हणजे वनडेमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावांच्या पहिल्या १० खेळींमध्ये ५ खेळी या भारतीय क्रिकेटपटूंनी केल्या आहेत. याबद्दलच या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
एका वनडे डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय खेळाडू –
५. सचिन तेंडुलकर – नाबाद २०० धावा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २४ फेब्रुवारी २०१० ला पुरुषांच्या वनडेमध्ये पहिलेच द्विशतक करण्याचा इतिहास रचला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्वाल्हेर येथे झालेल्या वनडे सामन्यात १४७ चेंडूत २५ चौकार आणि ३ षटकार मारत नाबाद २०० धावा केल्या होत्या. त्यावेळी तो वनडेमध्ये द्विशतक करणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला होता. एवढेच नाही तर कसोटी आणि वनडेमध्ये द्विशतके करणाराही ते पहिला क्रिकेटपटू होता.
त्याची ही नाबाद २०० धावांची खेळी भारताकडून वनडे डावात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत ५ व्या क्रमांकावर आहे. तर वनडे डावात सर्वाधिक धावा करण्याच्या जागतिक यादीत ८ व्या क्रमांकावर आहे.
४. रोहित शर्मा – नाबाद २०८ धावा
सध्याचा भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने १३ डिसेंबर २०१७ ला श्रीलंकेविरुद्ध नाबाद २०८ धावांची खेळी केली होती. मोहालीला झालेल्या या सामन्यात रोहितने १५३ चेंडूत १३ चौकार आणि १२ षटकारांसह ही खेळी केली होती. हे त्याचे वनडे कारकिर्दीतील तिसरे द्विशतक होते. त्यामुळे त्याने वनडेत ३ द्विशतके करण्याचा विश्ववविक्रम रचला होता.
विशेष म्हणजे हे द्विशतक त्याने त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या दिवशी केले असल्याने ते त्याने त्याची पत्नी रितिकाला समर्पित केले होते.
त्याची ही नाबाद २०८ धावांची खेळी भारताकडून वनडे डावात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत ४ थ्या क्रमांकावर आहे. तर वनडे डावात सर्वाधिक धावा करण्याच्या जागतिक यादीत ७ व्या क्रमांकावर आहे.
३. रोहित शर्मा – २०९ धावा
रोहित शर्माने पहिले द्विशतक २ नोव्हेंबर २०१३ ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. त्याने त्यावेळी १५८ चेंडूत २०९ धावांची खेळी केली होती. यावेळी त्याने १२ चौकार आणि तब्बल १६ षटकार मारले होत. त्याने ९६ धावा या केवळ षटकार मारुन केल्या होत्या. त्यावेळी तो एका वनडेत सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला होता. त्याच्या या विक्रमाची बरोबरी एबी डिविलियर्सने २०१५ ला केली आणि ओएन मॉर्गनने २०१९ च्या विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध १७ षटकार मारत रोहितचा हा विक्रम मोडला.
रोहितची ही २०९ धावांची खेळी भारताकडून वनडे डावात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत ३ऱ्या क्रमांकावर आहे. तर वनडे डावात सर्वाधिक धावा करण्याच्या जागतिक यादीत ६ व्या क्रमांकावर आहे.
२. विरेंद्र सेहवाग – २१९ धावा
भारताचा माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने ८ डिसेंबर २०११ला इंदोर येथे पार पडलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सामन्यात २१९ धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्याने ही खेळी १४९ चेंडूत २५ चौकार आणि ७ षटकार मारत केली होती. त्यावेळी तो सचिननंतरचा वनडेत द्विशतक करणारा दुसराच फलंदाज होता.
तसेच त्यावेळी त्याने वनडेत सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करण्याचाही विश्वविक्रम केला होता. त्याचा हा विश्वविक्रम २०१४ ला रोहित शर्माने २६४ धावांची खेळी करत मोडला. तर २०१५ ला मार्टिन गप्टिलने नाबाद २३७ धावांची खेळी करत सेहवागच्या विक्रमाला मागे टाकले होते.
पण आजही सेहवागची ही २१९ धावांची खेळी भारताकडून वनडे डावात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत २ ऱ्या क्रमांकावर असून जागतिक यादीत रोहित आणि गप्टिलनंतर ३ऱ्या क्रमांकावर आहे.
१. रोहित शर्मा – २६४ धावा
वनडेमध्ये रोहितने पहिले द्विशतक झळकावल्यानंतर १ वर्षाने १३ नोव्हेंबर २०१४ ला दुसरे द्विशतक श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे खेळताना केले. त्यावेळी त्याने १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने २६४ धावांची खेळी केली होती. रोहितने २६४ धावांपैकी तब्बल १८६ धावा चौकार आणि षटकार मारत केल्या होत्या.
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली होती. आजही त्याचा हा विक्रम अबाधित आहे. त्यामुळे त्याची ही खेळी केवळ भारताकडूनच नाही तर जगातिक यादीतही वनडे डावात सर्वाधिक धावांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.
ट्रेंडिंग लेख –
विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिकवेळा सामना गमावलेले ६ संघ; पाहा कोण आहे, क्रमांक १ वर…
संपुर्ण यादी- भारतीय संघाचे आजपर्यंतचे वनडे कर्णधार व त्यांचे विक्रम
एका रनआऊटने झाले होते मैदानात दंगे, ६५ हजार प्रेक्षकांना स्टेडियमबाहेर काढून घेतला होता सामना