क्रिकेट या खेळात जसे फलंदाज आणि गोलंदाज महत्त्वाचे असतात तसेच खेळ नियमाने खेळला जातोय हे पहाण्यासाठी पंच महत्त्वाचे असतात. प्रत्येक खेळाप्रमाणेच क्रिकेटमध्येही पंच महत्त्वाची भूमीका निभावतात. त्यांच्या निर्णयाने अनेक गोष्टी सामन्यात बदलत जातात.
बऱ्याचदा पंचांकडून चूकाही होतात आणि त्याबद्दल त्यांना टिकेला सामोरेही जावे लागते. पण जे पंच खूप चूका करत नाहीत ते अनेकांच्या पसंतीस पडतात. आत्तापर्यंत क्रिकेट इतिहासात असे अनेक पंच होऊन गेले आहेत, ज्यांनी त्यांच्या प्रमाणिकपणामुळे, वेगळ्या शैलीमुळे आणि निर्णयातील अचूकतेच्या आधारावार मोठे नाव मिळवले, जे अनेकांच्या पसंतीस उतरले. अशाच ५ पंचांचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
चाहत्यांच्या सर्वाधिक पसंतीस उतरलेले ५ क्रिकेट पंच –
५. अलीम दार –
खेळाडू म्हणून क्रिकेट खेळल्यानंतर अलीम दार यांनी पंच म्हणून काम करायला सुरुवात केली. २००४ पासून ते आयसीसी पंचांच्या एलिट पॅनलचा भाग आहेत. तसेच ते आयसीसी पंच्यांच्या एलिट पॅनलमध्ये सहभागी होणारे पहिले पाकिस्तानी पंच देखील आहेत.
पंच म्हणून अलीम दार यांनी २००० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आजपर्यंत ते त्यांचे काम अत्यंत चांगल्याप्रकारे करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत पुरुषांच्या ४८५ आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम केले आहे. यात ३८६ सामन्यात त्यांनी मैदानावरील पंच म्हणून काम केले आहे, तर ९९ सामन्यात त्यांनी टीव्ही पंच म्हणून काम केले आहे.
तसेच ५ महिला टी२० सामन्यात त्यांनी मैदानावरील पंच म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय त्यांनी वनडे विश्वचषक, टी२० विश्वचषक, महिला टी२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी अशा अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम केले आहे.
अलीम दार हे प्रसिद्ध पंचांपैकी एक असून त्यांच्या अचूक निर्णयांसाठी ओळखले जातात. त्यांना सलग तीन वेळा आयसीसीचे वर्षातील सर्वोत्तम पंचचा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांना हा पुरस्कार २००९, २०१० आणि २०११ या तीन वर्षी मिळाला आहे.
४. सायमन टॉफेल –
क्रिकेटमधील सर्वात प्रसिद्ध पंचांपैकी एक नाव म्हणजे सायमन टॉफेल. ज्यावेळी डिआरएस रिव्ह्यू क्रिकेटमध्ये आले नव्हते त्यावेळी ते कठिण प्रसंगीही त्यांच्या अचूक निर्णयांसाठी प्रसिद्ध होते. पंच म्हणून टॉफेल यांनी १९९९ ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काम केले. त्यांनी पुरुषांच्या २८२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मैदानावरील पंच म्हणून तर ६७ सामन्यात टीव्ही पंच म्हणून काम पाहिले.
एवढेच नाही तर ७ महिला वनडे सामन्यांमध्ये आणि २ महिला टी२० सामन्यांमध्येही टॉफेल यांनी पंच म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी आयसीसीच्या मोठ्या स्पर्धांमध्येही पंचांची भूमिका चांगल्याप्रकारे साकारली.
विशेष म्हणजे जेव्हा आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम पंच या पुरस्काराची २००४ मध्ये सुरुवात केली तेव्हा पहिले सलग ५ वर्षे हा पुरस्कार टॉफेल यांनी जिंकला होता.
टॉफेल पंच म्हणून निवृत्त झाल्यानंतरही क्रिकेटमध्ये सक्रिय राहिले. ते ऑक्टोबर २०१५ पर्यंत आयसीसीच्या पंचाची कामगिरी( ICC’s Umpire Performance) आणि ट्रेनिंग मॅनेजर म्हणून काम करत होते.
३. डिकी बर्ड –
इंग्लंडचे पंच डिकी बर्ड यांनी १९५६ ते १९६४ दरम्यान खेळाडू म्हणून क्रिकेट खेळले आहे. तसेच ते एक चांगले फुटबॉल खेळाडू देखील होते. खेळाडू म्हणून कारकिर्द घडवल्यानंतर त्यांनी पंच म्हणून काम करायला सुरुवात केली. ते केवळ त्यांच्या अचूक निर्णयामुळेच नाही तर त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावामुळेही प्रसिद्ध होते.
बर्ड यांनी पंच म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९७३ ते १९९६ दरम्यान काम केले. त्यांनी १३५ पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानावरील पंच म्हणून काम केले. तर ७ महिला वनडे सामन्यातही पंचगिरी केली. याबरोबरच आयसीसीच्या तीन वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून काम करणारे ते पहिले पंच आहेत.
२. बिली बॉऊडेन –
क्रिकेटमधील सर्वाधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय पंचांपैकी एक म्हणजे बिली बॉऊडेन. न्यूझीलंडचे असणारे बिली बॉऊडेन हे केवळ त्यांच्या निर्णयांसाठी नाही तर त्यांची मैदानावरील मजेशीर हावभावांसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेकदा मैदानावर निर्णय देताना केलेल्या मजेशीर कृती चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्याही पसंतीस पडल्या.
त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९९५ ते २०१६ दरम्यान पंचगिरी केली. त्यांनी पुरुषांच्या ३०८ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये मैदानावरील पंच म्हणून काम केले, तर ८७ सामन्यांमध्ये टीव्ही पंच म्हणून काम केले.
याशिवाय त्यांनी ४३ महिला आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानावरील पंच म्हणून काम पाहिले आहे. त्याचबरोबर १ महिला सामन्यात टीव्ही पंच म्हणून काम केले आहे. २०१३ नंतर त्यांना आयसीसीच्या पंचांच्या एलिट पॅनेलमधून वगळण्यात आले होते.
१. डेव्हिड शेफर्ड –
क्रिकेटमधील लोकप्रिय पंचांपैकी एक म्हणजे इंग्लंडचे डेव्हिड शेफर्ड. ते त्यांच्या अचूक निर्णयांबरोबरच त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे केवळ चाहत्यांचेच नाही तर खेळाडूंचेही आवडते पंच होते.
ते ज्यावेळी एखादा संघ फलंदाजी करताना १११ धावा करायचा तेव्हा एक पाय वर करायचे. त्यांची ही कृतीही प्रसिद्ध होती. “111”, ज्याला “नेल्सन” म्हणून ओळखले जाते; नेल्सन हा विशेषतः इंग्लिश क्रिकेटमध्ये एक दुर्दैवी धावसंख्या असल्याचे मानले जाते. त्यामुळे शेफर्ड यांचा विश्वास होता की त्यावेळी एखादी विकेट जाऊ शकते.
त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९८३ ते २००५ दरम्यान पंच म्हणून काम केले. त्यांनी २६४ पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात मैदानावर पंचगिरी केली, तर १६ सामन्यांमध्ये टीव्ही पंच म्हणून काम पाहिले. तसेच त्यांनी महिल्यांच्या १ वनडे सामन्यात पंच म्हणून काम केले. विशेष म्हणजे त्यांनी २२ स्पर्धांच्या अंतिम सामन्यात पंचगिरी केली आहे. आजही हा एक विक्रम आहे.
त्यांना सर्वात मोठा सन्मान मिळाल तो २००४ मध्ये, जेव्हा आयसीसीने त्यांच्या नावाने वर्षातील सर्वोत्तम पंच हा पुरस्कार सुरु केला. दरवर्षी आयसीसीकडून दिला जाणारा सर्वोत्तम पंचांचा पुरस्कार हा डेव्हिड शेफर्ड ट्रॉफी म्हणून ओळखला जातो.
वाचनीय लेख –
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”
वनडे सामनाही कसोटीसारखा खेळणारे ५ भारतीय फलंदाज
इतिहासात: आम्ही आलोय.. भारताचा क्रिकेटजगताला संदेश..