भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) दरवर्षी देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेचा चौदावा हंगाम सोमवारी (२२ नोव्हेंबर) संपला. या हंगामात तामिळनाडू संघाने कर्नाटकविरुद्ध खेळताना अंतिम सामना जिंकला. तामिळनाडू संघाचे हे तिसरे विजेतेपद ठरले आहे. याशिवाय तामिळनाडू स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपद मिळवणारा संघ बनला आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंगकडून खेळणाऱ्या शाहरुख खानने अंतिम सामन्यात तामिळनाडू संघाला विजयासाठी ५ धावांची गरज असताना षटकार ठोकून विजय मिळवून दिला.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी केवळ चाहतेच पाहत नाही तर आयपीएल फ्रँचायझी देखील यावर नजर ठेवून असतात. सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेच्या चौदाव्या हंगामात दमदार कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंवर एक नजर टाकूया. या खेळाडूंवर आयपीएल २०२२ च्या लिलावात संघांची नजर असेल.
चमा मिलिंद
या यादीत पहिले नाव आहे चमा मिलिंद या खेळाडूचे. मिलिंद सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये हैदराबाद संघाकडून खेळताना दिसला आणि आपल्या शानदार गोलंदाजीच्या बळावर हैदराबाद संघाला उपांत्य फेरीपर्यंत नेले. इतकेच नाही तर मिलिंद सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या या मोसमात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाजही ठरला. टी२० प्रकारामध्ये एकदा पाच बळी घेणे ही गोलंदाजासाठी मोठी कामगिरी मानली जात असते. या गोलंदाजाने एकाच हंगामात दोनदा अशी कामगिरी बजावली आहे. मिलिंदने ७ सामन्यात २४.५ षटके टाकले आणि १८ बळी घेतले आहेत. अशा परिस्थितीत, आयपीएल २०२१ मध्ये जेव्हा मेगा लिलाव होईल, तेव्हा जवळपास प्रत्येक सामन्यात ३ बळी घेणाऱ्या या गोलंदाजावर आयपीएल संघांची नक्कीच नजर असेल.
दर्शन नळकांडे
या यादीत दुसरे नाव विदर्भाचा वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडेचे आहे, ज्याने उपांत्य फेरीच्या सामन्यात कर्नाटकविरुद्ध ४ चेंडूत ४ बळी घेतले होते. नळकांडेने उपांत्य फेरीच्या सामन्याचे २० वे षटक टाकले होते, आणि त्याने अवघी एक धाव देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलसारख्या स्पर्धेत प्रत्येक संघ डेथ ओव्हर स्पेशालिस्टच्या शोधात असतो. त्यामुळे नळकांडे या स्पर्धेत अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. नळकांडेने स्पर्धेतील ८ सामन्यात २६ षटके टाकली आणि १३ बळी घेतले.
तन्मय अग्रवाल
हैदराबादकडून खेळणारा २६ वर्षीय तन्मय अग्रवाल सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खूप जबरदस्त प्रदर्शन करताना दिसला. तन्मय सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. तन्मयने ७ सामन्यात ३३४ धावा केल्या आहेत. तन्मयने या स्पर्धेत चार अर्धशतके झळकावली आणि एकदा तन्मयने ९७ धावांची खेळी खेळली. त्याचे शतक ३ धावांनी हुकले. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दोन नवीन संघ सामील झाले आहेत. त्यामुळे हे नवीन संघ नवीन फलंदाजाचा शोध घेतील जे वरच्या फळीत फलंदाजी करू शकतील. तेव्हा तन्मय अग्रवाल अशा संघासाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकेल.
शेल्डन जॅक्सन
शेल्डन जॅक्सन हे देशांतर्गत क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे, जो बऱ्याच काळापासून चांगली फलंदाजी करत आहे. पॉंडेचेरीकडून खेळताना त्याने ६ सामन्यात २७१ धावा केल्या आहेत. शेल्डन जॅक्सन आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो पण केकेआरला रिटेन्शन नियमांनुसार त्याला कायम ठेवणे कठीण जाणार आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा मेगा लिलाव होईल, तेव्हा अनेक संघ या खेळाडूला त्यांच्या शिबिरात समाविष्ट करण्यासाठी स्पर्धा करतील. जॅक्सनने या हंगामात ६ सामन्यात ४ अर्धशतके झळकावली आहेत.
जितेश शर्मा
विदर्भाचा यष्टिरक्षक-फलंदाज जितेश शर्माने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आयपीएल २०२१ च्या मेगा लिलावात अनेक संघ त्याच्यावर नजर ठेवून असतील. मधल्या फळीत दमदार फलंदाजी करण्याव्यतिरिक्त, जितेश शर्मा यष्टीरक्षणात देखील महत्त्वपूर्ण योगदान देतो. विदर्भासाठी मधल्या फळीत फलंदाजी करताना जितेश शर्माने ८ सामन्यांच्या ७ डावात २१९ धावा केल्या आहेत.