आयपीएल म्हटले की नेहमीच फलंदाजांची चौफेर फटकेबाजी पहायला मिळते. दरवर्षी आयपीएलमध्ये अनेक चौकार आणि षटकार दिसतात. अनेक खेळाडू आक्रमक फलंदाजी करत मोठ्या खेळी उभ्या करतात. मुळातच टी२० क्रिकेट वेगात खेळले जाते. त्यामुळे या क्रिकेटप्रकारात वेगात जशा धावा निघतात, तशाच अनेकदा विकेट्स पडतात. प्रत्येक षटकात एक वेगळा थरार क्रिकेट रसिकांना पहायला मिळतो. केवळ २०-२० षटकांचा सामना असल्याने प्रत्येक चेंडू क्रिकेटपटूला महत्त्वाचा असतो. सामन्यात एक षटकही पूर्ण सामन्याची दिशा बदलण्यासाठी महत्त्वाचे ठरते.
या लेखातही अशा ५ क्रिकेटपटूंचा आढावा घेतला आहे ज्यांनी आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही १ षटकात सर्वाधिक धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये १ षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
५. शॉन मार्श (Shaun Marsh) – ३० धावा
आयपीएल २०११ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध आरसीबी यांच्यात सामना रंगला होता. या सामन्याच्या १५ व्या षटकात आरसीबीचा गोलंदाज जोहान व्हॅन डर वाथच्या गोलंदाजीवर पंजाबचा फलंदाज शॉन मार्शने ३० धावा ठोकल्या. या षटकात शॉन मार्शने ३ चौकार आणि ३ षटकार लगावले.
वास्तविक, मार्शने पहिल्या २ चेंडूत सलग २ षटकार ठोकले. यानंतर पुढच्या ३ चेंडूंवर त्याने ३ चौकार लगावले. शेवटच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला आणि अशा प्रकारे त्याने एका षटकात ३० धावाही केल्या.
या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने प्रथम फलंदाजी करताना २३२ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची संघ केवळ १२१ धावांवर बाद झाला. पंजाबने हा सामना १११ धावांनी जिंकला.
४. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) – ३० धावा
विस्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने आयपीएल २००८ मध्ये अँड्र्यू सायमंड्सच्या एका षटकात ३० धावा ठोकल्या. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर, दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध डेक्कन चार्जर्स दरम्यान हा सामना खेळला गेला होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डेक्कन चार्जर्सने १४२ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने फक्त एक विकेट गमावून हा सामना जिंकला. या सामन्यात दिल्लीकडून सेहवागने ४१ चेंडूत नाबाद ९४ धावा केल्या होत्या.
डेक्कनकडून गोलंदाजीत अँड्र्यू सायमंड्सने १३ वे षटक टाकले होते. त्या षटकात सेहवागने पहिल्या चेंडूवर चौकार तर दुसर्या चेंडूवर षटकार, तिसर्या चेंडूवरवर एक चौकार तर चौथ्या चेंडूवर षटकार, पाचव्या चेंडूवर चौकार आणि सहाव्या चेंडूवर षटकार लगावला. अशा रीतीने सेहवागने ३० धावा ६ चेंडूंमध्ये केल्या.
३. विराट कोहली ( Virat Kohli) – ३० धावा
आयपीएल २०१६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात लायन्स यांच्यात सामना खेळला गेला. या सामन्याच्या १९ व्या षटकात आरसीबीचा फलंदाज विराट कोहलीने गुजरात लायन्सचा गोलंदाज शिवल कौशिकच्या गोलंदाजीवर ३० धावा केल्या.
पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीने षटकार मारला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने चौकार ठोकला. यानंतर पुढील तीन चेंडूंवर सलग ३ षटकार लगावले. त्याच वेळी त्याने शेवटच्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली आणि अशा प्रकारे शिवल कौशिकच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने एकूण ३० धावा जमविल्या.
या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २४८ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात लायन्सचा संघ केवळ १०४ धावांत सर्वबाद झाला.
२. सुरेश रैना (Suresh Raina) – ३३ धावा
आयपीएल २०१४ चा दुसरा क्वालिफायर सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब समोरासमोर होते. प्रथम फलंदाजी करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने २२७ धावा केल्या.
या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईने डाव सुरू केला आणि सुरेश रैनाने या सामन्यात २५ चेंडूत ८७ धावा केल्या. मात्र, त्यांची शानदार खेळी असूनही चेन्नई संघाला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले.
या सामन्याच्या सहाव्या षटकात सुरेश रैनाने किंग्ज इलेव्हन पंजाबचा गोलंदाज परविंदर आवाना विरुद्ध ६ चेंडूवर ३३ धावा केल्या. त्याने अवानाच्या पहिल्या २ चेंडूंवर सलग २ षटकार ठोकले होते. यानंतर, पुढच्या पाच चेंडूंमध्ये त्याने सलग ५ चौकार ठोकले. वास्तविक, पाचवा चेंडू नो बॉल असल्याने, अवानाला तो चेंडू पुन्हा टाकावा लागला.
१. ख्रिस गेल (Chris Gayle) – ३७ धावा
आयपीएल २०११ मध्ये आरसीबी आणि कोची टस्कर्स केरळ यांच्यात खेळलेल्या सामन्यात कोचीने प्रथम फलंदाजी करताना १२५/९ धावा केल्या. आरसीबीने अवघी १ विकेट गमावून १२८ धावा करुन सामना सहज जिंकला.
या सामन्याच्या तिसर्या षटकात कोची टस्कर्स केरळचा गोलंदाज प्रशांत परमेश्वरनच्या गोलंदाजीवर आरसीबीचा फलंदाज ख्रिस गेलने ३७ धावा केल्या, जो आयपीएलमधील एका षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे.
पहिल्याच चेंडूवर ख्रिस गेलने षटकार ठोकला, त्यानंतर पुढचा चेंडू नो बॉल आणि या चेंडूंवर षटकार ठोकला. पुढच्या २ चेंडूंवर त्याने २ चौकार ठोकले. यानंतर, पुढच्या २ चेंडूंवर पुन्हा षटकार मारले आणि शेवटचा चेंडूवर चौकार मिळवला.
अशाप्रकारे, नो बॉलच्या साहाय्याने ७ चेंडूत ख्रिस गेलने एकूण ३७ धावा जमविल्या, त्यापैकी त्याने फलंदाजीद्वारे ३६ धावा केल्या, तर त्याच्या संघाला अतिरिक्त म्हणून १ धावा मिळाली.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२० – या ५ युवा परदेशी खेळाडूंच्या कामगिरीवर असेल सर्वांची नजर…
आयपीएलमध्ये खेळाडू आणि कर्णधार म्हणून सुपर डुपर फ्लॉप ठरलेले ४ दिग्गज
४ दिग्गज क्रिकेटर, जे मुंबई इंडियन्सकडून खेळताना ठरले फ्लॉप
महत्त्वाच्या बातम्या –
अपंग भारतीय क्रिकेटर्सचे होतायत हाल, सौरव गांगुलीकडून आहे मदतीची अपेक्षा
गेल्या ४ वर्षात अशी अफलातून कामगिरी करणारा शान मसूद पहिलाच सलामीवीर
“टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ३-४ पदके जिंकतील,” बजरंग पुनिया