२००८ ला सुरुवात झालेल्या इंडियन प्रीमीयर लीगने गेल्या १३ वर्षात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. या कालावधीत छोट्या गावापासून मोठ्या शहरांपर्यंतचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये खेळले. अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीसाठी आयपीएल महत्त्वाचा टप्पा ठरला.
पण यातील काही क्रिकेटपटू असे होते ज्यांनी केवळ एका मोसमात चमकदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधले. त्या एका मोसमासाठी ते त्यांच्या संघासाठी हिरो ठरले. मात्र त्यानंतर त्यांची कामगिरी म्हणावी तशी झाली नाही. एका आयपीएल मोसमाचा अपवाद वगळता ते अन्य मोसमात फ्लॉप ठरले. अशाच ५ खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
मनप्रीत गोणी – भारताचा वेगवान गोलंदाज मनप्रीत गोणीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स, डेक्कन चार्जर्स, गुजरात लायन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना एकूण 44 सामन्यात 37 विकेट्स घेतल्या आहेत.
तो सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. पहिल्याच मोसमात त्याने शानदार कामगिरी करताना सर्वांचे लक्ष वेधले. त्याला २००८ च्या आयपीएल मोसमानंतर भारतीय संघाकडून खेळण्याची संधीही मिळाली. तो २ वनडे सामने खेळला. २००८ च्या आयपीएलमध्ये त्याने २६.०६ च्या सरासरीने आणि ७.३८ च्या इकोनॉमी रेटने १६ सामन्यात १७ विकेट्स घेतल्या. तो त्या मोसमात सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज होता.
त्याच्या या कामगिरीमुळे तो पुढचे दोन मोसमही चेन्नईकडून खेळला. पण त्यानंतर त्याचा फॉर्म खराब झाला. त्यामुळे त्याला संघातील जागा गमवावी लागली. नंतर तो २ मोसम डेक्कन चार्जर्सकडून खेळला. तसेच २०१३ ते २०१७ दरम्यान तो किंग्स इलेव्हन पंजाब संघात होता. मात्र २००८ नंतर त्याला अपेक्षित यश मिळाले नाही.
कॅमेरॉन व्हाईट –
२००५ ते २०१८ दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या कॅमरॉन व्हाईटने १४२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्याने त्यातील ६ टी२० आणि १ वनडेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्वही केले. तो आयपीएमध्ये २००८ ते २०१३ दरम्यान खेळला. त्याने या दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैद्राबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना एकूण ४७ सामने खेळले.
पण त्याच्यासाठी २०१२ चा आयपीएल मोसम अविस्मरणीय ठरला. त्या मोसमात तो डेक्कन चार्जर्सकडून खेळत होता. त्या मोसमात त्याने १३ सामन्यात ४३.५४ च्या सरासरीने ४७९ धावा केल्या होत्या. यात त्याच्या ५ अर्धशतकांचाही समावेश आहे. मात्र तो मोसम वगळता व्हाईटला अन्य मोसमात खास काही करता आले नाही.
तो आयपीएलच्या सुरुवातीला पहिले ३ मोसम बेंगलोर संघाकडून खेळला. तर २०११-२०१२ चे मोसम तो डेक्कन संघाकडून खेळला आणि २०१३ ला तो सनरायझर्स हैद्राबादकडून खेळला.
पॉल वॉल्थटी – २०११ च्या आयपीएल मोसमात वॉल्थटीला किंग्स इलेव्हन पंजाबचा एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने संधी मिळाली. त्याने ही संधी दोन्ही हातांनी पकडत फलंदाजीत कमाल केली. त्याने या मोसमात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध १८९ धावांचा पाठलाग करताना ६३ चेंडूत १२० धावांची खेळी केली. याच मोसमात त्याने आशाच काही आक्रमक खेळी केल्या. त्याने त्या मोसमात १४ डावात ४६३ धावा केल्या होत्या. त्यामुळे जेव्हा हा मोसम संपला तेव्हा तो सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता.
मात्र यानंतर त्याचा फॉर्मही हरवला त्यामुळे त्याला जास्त संधी मिळाली नाही. २०१२ ला त्याला किंग्स इलेव्हन पंजाबकडून ६ सामन्यात त्याला ३० धावाच करता आल्या. तर २०१३ नंतर तो तितके व्यायसायिक क्रिकेटही खेळला नाही. सध्या वॉल्थटी एअर इंडियामध्ये काम करत असून त्यांच्याकडून क्रिकेटही खेळतो.
स्वप्निल आस्नोडकर – मुळचा गोव्याचा असणाऱ्या स्वप्निलने आयपीएलच्या पहिल्याच मोसमात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना शानदार खेळ केला. त्याने आयपीएलमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ३४ चेंडूत ६० धावांची खेळी केली. यामध्ये त्याच्या १० चौकारांचा आणि १ षटकाराचा समावेश होता.
त्याने त्या मोसमात राजस्थानकडून ९ सामन्यात ३११ धावा केल्या. त्याच्या पुढच्या मोसमातही राजस्थानने त्याला संघात कायम केले. मात्र २०११ च्या नंतर त्याला खराब फॉर्ममुळे वगळण्यात आले. २०११ नंतर तो आयपीएलमध्ये खेळला नाही.
ग्रॅमी स्मिथ – दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेकदा मोठे विक्रम केले आहेत. त्याचबरोबर तो २००८ ते २०११ दरम्यान आयपीएलमध्ये खेळला. तो २००८ ते २०१० पर्यंत राजस्थान रॉयल्सकडून खेळला. तर २०११ ला तो पुणे वॉरियर्स इंडिया संघाकडून खेळला.
मात्र त्याने खेळलेल्या ४ आयपीएल मोसमांपैकी २००८ चा मोसम त्याच्यासाठी खास ठरला. त्याने २००८ ला राजस्थान रॉयल्सला विजेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने त्या मोसमात ११ सामन्यात ४९ च्या सरासरीने ३ अर्धशतकांसह ४४१ धावा केल्या होत्या. या मोसमाव्यतिरिक्त स्मिथला अन्य मोसमात खास काही करता आले नाही.
ट्रेंडिंग लेख –
इंडियन क्रिकेट लीग अर्थात ‘वादग्रस्त आयसीएल’मुळे करियरचं मोठं नुकसान झालेले ५ दिग्गज क्रिकेटर
लिस्ट ए मध्ये इतकं चांगलं खेळूनही वनडेत खेळण्याची संधी न मिळालेले ५ भारतीय फलंदाज
विदेशी मुलींना जीवनसाथी म्हणून निवडलेले ३ भारतीय क्रिकेटपटू