आयपीएल ही जगातील सर्वात मोठी टी-२० लीग आहे. या स्पर्धेत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळालेत. जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू या लीगमध्ये खेळतात, त्याचबरोबर युवा भारतीय खेळाडूही या स्पर्धेत आपली प्रतिभा दाखवतात. आतापर्यंत अनेक मोठ्या फलंदाजांनी आयपीएलमध्ये जबरदस्त खेळी खेळली असून, नाव कमावले आहे.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात नवनवीन विक्रम नोंदवले जातात. या स्पर्धेत फलंदाज बरेच चौकार-षटकार मारून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात आणि अनेक विक्रम आपल्या नावावर करतात. आयपीएलमध्ये फलंदाज शतक ठोकतो तेव्हा तो आपल्या खेळीत चौकार-षटकार मारतोच. त्याचबरोबर काही खेळाडू अर्धशतकांच्या खेळी करतानाही फलंदाज चौकार-षटकार बऱ्याचदा ठोकतातच.
परंतु आयपीएलमधील काही खेळाडूंनी अर्धशतके असे देखील ठोकली आहेत, ज्यात त्या फलंदाजांनी एकही चौकार नाही परंतु केवळ षटकारच ठोकले. या लेखात आम्ही तुम्हाला त्या फलंदाजांविषयी सांगू ज्याने चौकार न ठोकता आयपीएलमध्ये अर्धशतके ठोकली आहेत.
आयपीएलमध्ये चौकार न ठोकता अर्धशतक ठोकणारे फलंदाज
५. राहुल तेवतिया – आयपीएल २०२०
राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू राहुल तेवतियाने आयपीएल २०२० मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध हा पराक्रम केला. यावेळी राजस्थान रॉयल्सचा संघ २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता. कर्णधार स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर राहुल तेवतियाला हिटर म्हणून फलंदाजीसाठी पाठविण्यात आले. परंतु, त्याच्या बॅटमधून पहिल्या २० चेंडूत धावा निघाल्या नाहीत आणि त्याने ५० पेक्षा कमीच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. मात्र त्यानंतर त्याने आक्रमक खेळण्यास सुरुवात केली. त्याने शेल्ड्रॉन कॉट्रेलच्या एकाच षटकात ५ षटकार ठोकले आणि संघाला सामन्यात परत आणले.
या सामन्यात राहुल तेवतियाने ३१ चेंडूत ७ षटकारांच्या मदतीने ५३ धावा फटकावल्या आणि त्याच्या खेळीत एकही चौकार नव्हता हे विशेष.
४. नितीश राणा – आयपीएल २०१७
२०१७ च्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना नितीश राणाने किंग्स इलेवन पंजाब विरुद्ध ३४ चेंडूत ६२ धावांची नाबाद खेळी खेळली होती. नितीश राणाने या खेळीत ७ षटकार ठोकले परंतु एकही चौकार लगावला नाही. त्याच्या आणि जोस बटलरच्या उत्कृष्ट खेळीमुळे मुंबईने किंग्ज इलेव्हन पंजाबला सहज पराभूत केले होते.
३. संजू सॅमसन – आयपीएल २०१८
संजू सॅमसन गेल्या काही हंगामापासून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून चांगली कामगिरी करत आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध २०१८ च्या आयपीएल हंगामात ४५ चेंडूंमध्ये नाबाद ९२ धावा केल्या होत्या. त्याने या खेळीत एकही चौकार न ठोकता अर्धशतक पूर्ण केले होते. ९२ धावांच्या खेळीदरम्यान त्याने १९ व्या षटकात २ चौकार ठोकले. आपल्या खेळीदरम्यान त्याने या सामन्यात चिन्नास्वामी स्टेडियमवर १० षटकार ठोकले.
२. डेव्हिड मिलर – आयपीएल २०१४
डेव्हिड मिलर आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून अनेक सामने खेळला आहे. आता तो राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य असला तरी आयपीएल २०१४ मध्ये पंजाबला अंतिम फेरीत आणण्यात त्याचे मोठे योगदान होते.
२०१४ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने केवळ १९ चेंडूत नाबाद ५२ धावांची स्फोटक खेळी साकारली होती. या खेळीदरम्यान त्याने ६ षटकार लगावले पण एकही चौकार मारला नाही. त्यांच्या डावामुळे पंजाबने १९२ धावांचे लक्ष्य सहज गाठले होते.
१. संजू सॅमसन – आयपीएल २०१७
संजू सॅमसनने आयपीएल २०१७ मध्ये गुजरात लायन्सविरूद्ध फक्त ३१ चेंडूत ६१ धावा ठोकल्या होत्या. त्यावेळी तो दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा भाग होता. गुजरातविरुद्ध २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने हा धुवांधार डाव खेळत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि विशेष म्हणजे या खेळीत त्याने ७ षटकार ठोकले होते, पण एकही चौकार मारला नव्हता.