बेमातारा। महाराष्ट्र व केरळ संघांनी छत्तीसगढ हौशी खो-खो असोसिएशन आयोजित 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष गटाच्या उपांत्यफेरीत धडक मारली. रविवारी अॅलन्स पब्लिक स्कूल ग्राऊंडवर ही स्पर्धा पार पडली.
गतविजेता महाराष्ट्र संघाने साजेशी कामगिरी करत पश्चिम बंगाल संघावर 15-8 असा तर, केरळ संघाने मजबूत समजल्या जाणा-या कर्नाटक संघावर 17-11 असा विजय मिळवला. महाराष्ट्राच्या प्रतिक वाईकरने तीन मिनिटे 40 सेकंदसह बचावात चमक दाखवली. केरळ संघाकडून अरुण एसएने अष्टपैलू कमागिरी केली. त्याने तीन मिनिटे व 40 सेकंद बचावासह चार गुणांची कमाई केली.
महाराष्ट्र व केरळ संघ सोमवारी कोल्हापूर आणि रेल्वे संघाविरुद्ध उपांत्यफेरीत खेळतील. पुरुष आणि महिला गटाचे अंतिम सामने सोमवारी खेळविण्यात येतील. कोल्हापूरच्या संघाने आंध्रप्रदेश संघावर 22-10 असा तर, रेल्वेने विदर्भवर 13-9 असा उपांत्यपुर्व सामन्यात विजय मिळवला.
महिला गटात महाराष्ट्र व ओडिशा संघाने उपांत्यफेरीतील आपली जागा निश्चित केली. महाराष्ट्र संघाने हरयाणावर 14-8, ओडिशा संघाने केरळवर 11-9 असा विजय मिळवला. महाराष्ट्र व ओडिशा संघाचा सामना उपांत्यफेरीत अनुक्रमे कोल्हापूर व एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया यांच्याशी होईल. एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या विजयात प्रियंका भोजने पाच मिनिटे व 40 सेकंड बचावात चमक दाखवली आणि एक गुणाची कमाई केली. त्यापुर्वी चुरशीच्या सामन्यात कोल्हापूर संघाने दिल्लीवर 11-10 असा विजय नोंदवला. श्रुष्टी शिंदे व करिश्मा रिकीबदार यांनी कोल्हापूरसाठी चांगली कामगिरी केली. शिंदे हिने तीन मिनिटांच्या बचावासह दोन गुणांची कमाई केली. रिकिबदार हिने सहा मिनिटे 10 सेकंद बचाव केला.
निकाल ( उपांत्यफेरी) :
पुरुष : रेल्वे वि.वि.विदर्भ 13-9, महाराष्ट्र वि.वि. पश्चिम बंगाल 15-8, केरळ वि.वि.कर्नाटक 17-11, कोल्हापूर वि.वि. आंध्रप्रदेश 22-10
महिला : एअरपोर्ट अॅथोरिटी ऑफ इंडिया वि.वि. कर्नाटक 9-7, ओडिशा वि.वि. केरळ 11-9, कोल्हापूर वि.वि. दिल्ली 11-10, महाराष्ट्र वि.वि. हरयाणा 14-8