बेमातारा। महाराष्ट्रच्या पुरुष व महिला संघांनी छत्तीसगड हौशी खो खो असोसिएशन आयोजित 53 व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेत उप उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पुरुष व महिलांच्या गटात कोल्हापूर संघाने देखील उप उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
गतविजेता महाराष्ट्र पुरुष संघाने उत्तरप्रदेश संघावर 13-2 अशा फरकाने विजय मिळवला. महिला संघाने चंदीगड संघावर 14-7 अशा फरकाने विजय नोंदवला.पुरुषांच्या संघात प्रतीक वाईकर आणि महेश शिंदे यांनी चमक दाखवली. तर, वाईकरने दोन मिनिटे बचाव आणि आक्रमणात दोन गुण मिळवले. महिला संघाच्या विजयात रेश्मा राठोड आणि रुपाली बडे यांनी चमक दाखवली. रेश्मा व रुपाली यांनी तीन मिनिटे बचाव केला आणि आक्रमणात तीन गुणांची कमाई केली.
खेळासाठी ताकद महत्त्वाची असते. मी 80 च्या दशकात खो खो खेळण्यास सुरुवात केली. लोकप्रियतेबाबत बोलायचे झाल्यास अनेक वर्षात खेळात बदल झाला आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन ज्या पद्धतीने होत आहे त्यामुळे मी समाधानी असल्याचे छत्तीसगडच्या पोलीस महासंचालक दुर्गेश माधव अवस्थी यांनी शनिवारी सांगितले. त्या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अवस्थी या माजी राष्ट्रीय खो खो खेळाडू असून त्यांनी उत्तरप्रदेशचे प्रतिनिधित्व केले आहे.
त्यापूर्वी, पुरुष गटातील सामन्यात कोल्हापूरच्या संघाने अभिजित वसंतच्या चांगल्या कामगिरीमुळे झारखंडवर 21-7 असा विजय मिळवला. अभिजितने सहा मिनिटे बचाव केला (3 मि 30 सेकंद पहिल्या डावात आणि 2 मि 30 सेकंद दुसऱ्या डावात) आणि आक्रमणात तीन गुणांची कमाई केली. कोल्हापूरच्या महिला संघाने गोवावर 28-2 असा विजय नोंदवला यामध्ये श्रुती शिंदेने चमक दाखवली. श्रुतीने बचावात तीन गुण 10 सेकंद आणि आक्रमणात दोन गुण मिळवले. कर्नाटक व गुजरात संघानी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात उप उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.