भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडूलकरबद्दल नेहमी एक वाक्य बोलले जाते. ‘सचिन जेव्हा खेळत होता, तेव्हा तो एकटाच फलंदाजी करायचा. बाकी फलंदाजी फक्त मैदानावर हजेरी लावायला येतं असे.’
परंतु या वाक्यात किती सत्यता आहे ते आपण पाहणार आहोत. सचिनने कसोटीत २०० सामन्यांत ३२९ कसोटी डाव खेळले. यातील २३२ वेळा भारतीय संघ ऑल डाऊन अर्थात सर्वबाद झाला. हे सर्वबाद होताना सचिन हा तब्बल ५५ वेळा संघातील सर्वोच्च धावा करणारा खेळाडू होता. २३.७० टक्के वेळा सचिनने हा पराक्रम केला आहे. हा कसोटी क्रिकेटमधील एक विक्रम आहे.
असे असले तरी संघ ऑल डाऊन होताना कसोटीत सर्वाधिक वेळा सर्वोच्च धावा करण्याची टक्केवारी मात्र ब्रायन लाराच्या नावावर आहे. तो २७.४६च्या टक्केवारीने तब्बल ५३ वेळा संघातील सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
सर डाॅन ब्रॅडमन संघात असताना ऑस्ट्रेलिया संघ तब्बल ६१ वेळा ऑल डाऊन झाला होता. यात तब्बल २१ वेळा म्हणजेच ३४.४२ टक्के वेळा सर डाॅन ब्रॅडमन हे सर्वोच्च धावा करणारे खेळाडू ठरले होते.
भारतीय संघ सचिन संघात असताना जेव्हा ऑल डाऊन झाला तेव्हा ६ वेळा सचिन हा एकटाच असा खेळाडू राहिला आहे ज्याने ५० किंवा अधिक धावा केल्या आहेत. असा विक्रम लाराने ७ वेळा केला आहे.