भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग हा मोठ्या स्पर्धांचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने अनेकदा खेळताना मोठे विक्रम केले आहेत. त्याने २००७ च्या टी२० विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग ६ चेंडूत मारलेले ६ षटकार आजही प्रसिद्ध आहेत. युवराजने ट्वेंटी-२० मध्ये एकूण २३१ सामने खेळले आहेत. यात त्याने ४८५७ धावा केल्या असून २६१ षटकार मारले आहेत. तसेच यात त्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५८ टी२० सामन्यांचा समावेश असून यात त्याने ७४ षटकार मारले आहेत.
युवराजने ट्वेंटी२०मध्ये खेळताना अनेकदा षटकारांची हॅट्रिक केली आहे, म्हणजेच सलग तीन चेंडूंवर तीन षटकार मारले आहेत. या लेखात त्याच गोलंदाजांचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांना युवराजने ट्वेंटी२०मध्ये तीन किंवा त्यापेक्षा अधिक सलग षटकार मारले आहेत.
६. स्टुअर्ट ब्रॉड – २००७ टी२० विश्वचषक
२००७ ला झालेल्या पहिल्या आयसीसी टी२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध युवराजने सलग ६ चेंडूत ६ षटकार मारत इतिहास घडवला होता. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत होता. त्यावेळी १८व्या षटकात इंग्लंडच्या अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि युवराजमध्ये शाब्दिक चकमक झाली.
त्यानंतर युवराजने १९ व्या षटकात २१ वर्षीय स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर सलग ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. त्यावेळी तो हर्षल गिब्सनंतरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ चेंडूत ६ षटकार मारणारा दुसराच फलंदाज ठरला होता.
५. सईद अजमल (विरुद्ध पाकिस्तान, २०१२)
२८ डिसेंबर २०१२ ला भारत विरुद्ध पाकिस्तान संघात दुसरा टी२० सामना अहमदाबादला झाला होता. या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाकडून १९ व्या षटकात फिरकीपटू सईद अजमल गोलंदाजी करत होता. तसेच भारतीय संघाकडून युवराज स्ट्राईकवर होता. त्यावेळी युवराजने या षटकाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर सलग ३ षटकार मारले होते.
या सामन्यात युवराजने ३६ चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद ७२ धावा केल्या होत्या. त्याच्या या खेळीमुळे भारताने २० षटकात १९२ धावा करत १९३ धावांचे आव्हान पाकिस्तानला दिले होते. पण पाकिस्तानला १८१ धावाच करता आल्याने भारताने हा सामना सहज ११ धावांनी जिंकला होता.
४. युजवेंद्र चहल ( विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०१९)
२०१९ चा आयपीएल मोसम युवराजने मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. या मोसमातील ७ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध युवराजने मुंबई इंडियन्सकडून खेळताना युजवेंद्र चहलला सलग ३ षटकार मारले होते.
या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी केली होती. त्यावेळी युवराजने १४ व्या षटकात बेंगलोरचा फिरकीपटू युजवेंद्र चहलविरुद्ध पहिल्या तीन चेंडूंवर ३ षटकार ठोकले होते. त्यावेळी चौथ्या चेंडूवरही त्याने षटकार मारण्याचा प्रयन्त केला होता. पण त्या प्रयन्तान तो झेलबाद झाला.
३. इम्रान ताहिर (विरुद्ध दिल्ला डेअरडेविल्स, २०१४)
युवराज २०१४ च्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला होता. या मोसमातील ३८ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध झाला होता. त्या सामन्यात युवराजने त्या मोसमात दिल्लीकडून खेळणाऱ्या इम्रान ताहिर विरुद्ध ३ सलग षटकार मारले होते.
१३ मे २०१४ ला झालेल्या या सामन्यात बेंगलोरकडून फलंदाजी करताना युवराजने ताहिर गोलंदाजी करत असलेल्या १७ व्या षटकात दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारले होते.
२. राहुल शुक्ला (विरुद्ध दिल्ला डेअरडेविल्स, २०१४)
१३ मे २०१४ ला झालेल्या दिल्ली डेअरडेविल्स विरुद्धच्या सामन्यातच युवराजने १७ व्या षटकात ताहिरला ३ षटकार मारल्यानंतर २० व्या षटकात दिल्ली डेअरडेविल्सकडून खेळणाऱ्या राहुल शुक्लाच्या गोलंदाजीवर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारले होते. त्यावेळी एकाच सामन्यात बेंगलोरकडून खेळणाऱ्या युवराजने २ वेळा सलग ३ चेंडूत ३ षटकार मारण्याचा कारनामा केला.
त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या बेंगलोरकडून युवराजने २९ चेंडूत ६८ धावा केल्या होत्या. त्यामुळे बेंगलोरने २० षटकात ४ बाद १८६ धावा केल्या होत्या आणि दिल्लीला १८७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला १७० धावाच करता आल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने १६ धावांनी विजय मिळवला होता.
१. अशोक डिंडा (विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स, २०११)
२०११ ला आयपीएलमध्ये युवराज पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळला होता. त्याने त्या मोसमात १७ एप्रिल २०११ ला दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात अशोक डिंडाच्या गोलंदाजीवर ३ चेंडूत ३ षटकार मारले होते.
त्या सामन्यात पुण्याच्या संघाचे नेतृत्व करताना युवराजने दिल्लीकडून खेळणाऱ्या अशोक डिंडाच्या विरुद्ध २० व्या षटकात चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूंवर सलग ३ षटकार मारले होते.
त्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुण्याच्या संघाने युवराजच्या नाबाद ६६ धावांच्या खेळीच्या जोरावर १८७ धावा केल्या होत्या आणि १८८ धावांचे आव्हान दिल्लीला दिले होते. पण दिल्लीने २० षटकात १९० धावा करत हा सामना जिंकला.
ट्रेंडिंग लेख –
वनडेमध्ये पहिल्या विकेटसाठी झालेल्या ‘दहा’ सर्वोत्तम भागीदारी; भारताचे ‘हे’ दोन दिग्गजही यादीत