६६ व्या पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या आज तिसऱ्या दिवशी बादफेरीचे सामने पार पडले. रोहा येथे डी. जी. क्रीडागनगरी मैदानात राष्ट्रीय कबड्डी स्पर्धाचा थरार बघायला मिळाला. महाराष्ट्र विरुद्ध बिहार यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा पहिला सामना झाला.
बिहारने सुरुवातीलाच अजिंक्य पवारची पकड करत, नवीनने चढाईत गुण मिळवत २-० अशी आघाडी मिळवली. त्यानंतर तुषार पाटीलने २ गुण मिळवत २-२ अशी बरोबरी साधली. बिहारवर पहिला लोन टाकत महाराष्ट्र संघाने ११-०८ अशी आघाडी मिळवली.
मध्यंतरापर्यंत अशी आघाडी महाराष्ट्र कडे होती. रिशांक देवडिगाचे चढाईत ९ गुण व अजिंक्य पवारचे ७ गुण मिळाले आणि एक पकड केली. पकडीमध्ये विकास काळे ने उत्कृष्ट खेळ करत ५ पकडी केल्या. विशाल माने ने ३ पकडी केल्या. महाराष्ट्राने ३९-१६ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
तर दुसऱ्या उपांत्यपूर्व सामना रेल्वे विरुद्ध कर्नाटक असा झाला. रेल्वे कडून पवन कुमार, श्रीकांत जाधव, धर्मराज यांनी चांगला खेळ करत भारतीय रेल्वेला ५३-४२ असा विजय मिळवून दिला.
तिसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात सेनादलने ४२-३० असा उत्तराखंड वर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. तर हरियाणा विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात अंत्यत चुरशीची लढत झाली. हरियाणा संघाने ४९-४८ असा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
उपांत्य सामने:
१) महाराष्ट्र विरुद्ध भारतीय रेल्वे
२) सेनादल विरुद्ध हरियाणा