पुणे : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत धाराशीवच्या मनोज माने आणि नागपूरच्या शुभम मुसळे यांच्या ९२ किलो वजनी गटाची अंतिम लढत होणार आहे. उपांत्य फेरीत दोघांनी प्रतिस्पर्ध्यांचा कडवा प्रतिकार मोडून काढावा लागला. आदित्य कांबळे आणि स्वप्नील काशीद यांच्यात ७९ किलो वजनी गटात गादी विभागातील अंतिम लढत होणार आहे.
प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये सुरु आहे.
स्पर्धेतील ९२ किलो वजनी गटातून माती विभागातून अंतिम फेरी गाठताना मनोज मानेने धाराशिवच्या सुनील नवलेचे आव्हान ८-४ असे परतवून लावले. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत सुरुवातीलाच सुनीलने एकत्रित ४ गुणांची कमाई करून सनसनाटी सुरुवात केली. पण, त्यानंतर मनोजने दोन दोन गुणांची दोन वेळा कमाई करून पहिल्या फेरीत ४-४ अशी बरोबरी साधली.त्यानंतर सुनीलला बचावात्मक खेळण्याचा फटका बसला. उलट मनोजने दोनवेळा एकेक आणि एकदा दोन गुणांची घेत चार गुणांची कमाई करून विजयावर शिक्कामोर्तब केले. अंतिम फेरीत त्याची गाठ नागपूरच्या शुभम मुसळेशी पडणार आहे. शुभमनेही अंगद बुलबुलेचा पहिल्या फेरीतील प्रतिकार ८-५ असा परतवून लावला. अंगदने एकत्रित ४ आणि नंतर एका गुणाची कमाई करून पहिली फेरी जिंकली होती. पण, दुसऱ्या फेरीत शुभमने प्रतिआक्रमण करताना भारंदाज डावाचा पूर्ण वापर करत चार वेळा २ दोन गुणांची कमाई करताना विजयावर शिक्कामोर्तब केले.
याच वजनी गटात गादी विभागात विजय शिंदेने अंतिम फेरी गाठताना सोलापूरच्या निकेतन पाटीलचा तांत्रिक वर्चस्वावर १०-० असा पराभव केला. अन्य एका लढतीत पुण्याच्या अभिजित भोईने अनिकल जाधवचे आव्हान ७-१ असे मोडून काढले. स्पर्धेतील ८६ किलो वजनी गटातून विश्वचरण सोलकरने सांगलीच्या शुभम पवारचा ५-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
गादी विभागात ७९ किलो वजनी गटातन धाराशिवच्या आदित्य कांबळे याने नगरच्या धुळाजी ईटकरला तांत्रिक वर्चस्वावर ११-० असे हरवून अंतिम फेरी गाठली. पाच मिनिटे २२ सेकंद चाललेल्या या लढतीत आदित्यने सुरुवातीला १ नंतर एकत्रित ४ आणि पाठोपाठ तीनवेळा दोन दोन गुणांची कमाई करून विजयावर शिक्कामोर्तब केले. विजेतेपदाच्या लढतीत आदित्यची गाठ सोलापूरच्या स्वप्नील काशीदशी पडेल. स्वप्नील काशीदने वाशीमच्या स्वप्निल शिंदेचा गुणांवर ५-० असा पराभव केला. (66th Senior State Championship and Maharashtra Kesari Wrestling Tournament: Manoj Mane, Shubham Musale in finals with a tough fight)
महत्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारकडे भारताचा कर्णधार बनण्याची संधी, हार्दिक पंड्याबाबत संघ घेणार मोठा निर्णय
सचिनच्याही पुढे रचिन! पहिल्याच वर्ल्डकपमध्ये अनेक दिग्गजांचे विक्रम केले उद्ध्वस्त