राजस्थान राज्य कबड्डी असो. ने आयोजित केलेल्या “६७व्या वरिष्ठ पुरुष/ महिला गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत” भारतीय रेल्वेने दोन्ही विभागात विजेतेपद मिळवीत सलग दुसऱ्यांदा डबल धमाका केला. रेल्वेच्या महिलांनी ३३ वेळा या स्पर्धेवर आपले नाव कोरले. त्यातील ३१ वर्ष सलग विजेतेपद मिळवीत त्यांनी एक वेगळा विक्रम केला. तर रेल्वेच्या पुरुष संघाने २२ वेळा या विजेतेपदावर आपले नाव कोरले.
जयपूर येथील पूर्णिमा विद्यापीठाच्या संकुलात मॅटवर झालेल्या महिलांच्या अंतिम सामन्यात भारतीय रेल्वेने हिमाचल प्रदेशचे कडवे आव्हान ४०-३४ असे परतवून लावत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद आपल्याकडे राखले. महिलांनी ३३ वेळा हा पराक्रम केला.
पहिल्या डावात सावध खेळ करीत १६-१५ अशी आघाडी घेणाऱ्या रेल्वेला उत्तरार्धात देखील हिमाचलने चांगलेच झुंजविले. पण रेल्वेच्या या कठीण प्रसंगी एकेकाळची महाराष्ट्राची व आता रेल्वेकडून खेळणारी सोनाली शिंगटे धावून आली. तिने शेवटच्या काही मिनिटात एका चढाईत २गडी टिपत हा सामना रेल्वेच्या बाजूने झुकविला. रेल्वेच्या या विजयात सोनाली शिंगटेने ८ बोनस व ५ झटापटीत असे एकूण १३ गुण मिळविले. पूजाने तिला छान साथ देत चढाईत ९गुण, तर पायल चौधरीने ५ गुण मिळविले. पिंकीने ४, तर रितू नेगीने ३ पकडी करीत बचावाची बाजू भक्कम सांभाळली. हिमाचलकडून निधीने चढाईत १२गुण, तर पुष्पाने चढाईत ६ गुण घेत चांगली लढत दिली. भावनाने ३गुण चढाईत, तर २गुण पकडी करीत त्यांना छान साथ दिली.
अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारतीय रेल्वेने सेनादलाचा कडवा प्रतिकार २९-२७ असा मोडून काढत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद आपल्याकडे राखले. या स्पर्धेच्या इतिहासात रेल्वेने २२ वेळा या चषकावर आपले नाव कोरले. सेनादलाला सलग तिसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. आक्रमक सुरुवात करीत सेनादलाने मध्यांतराला १७-११ अशी आघाडी घेत वर्चस्व राखले होते. पण उत्तरार्धात त्यांना ही आघाडी टिकविता आली नाही. उत्तरार्धात रेल्वेने आपला खेळ गतिमान करीत विजयश्री खेचून आणली.
रेल्वेच्या या विजयात पवन शेरावत, विकास, धर्मराज चेलवनाथन, सुनील चमकले. पवनने चढाईत ७गुण व एक पकडीत गुण मिळविला. विकासाने चढाईत ६गुण कमविले. धर्मराज व सुनीलने ३-३पकडी यशस्वी केल्या. सेनादलाकडून नवीनकुमारने चढाईत ७गुण मिळविले. रोहित कुमारला या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. त्याला फक्त ३ गुण मिळविता आले. संदीप धुलने ६, तर सुरजितने ४ पकडी यशस्वी केल्या.
या अगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य फेरीत रेल्वेने झारखंडला ३९-१९, तर हिमाचालने हरयाणाला ३४-३२ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. पुरुषांच्या उपांत्य फेरीत रेल्वेने राजस्थानला ४६-२३, तर सेनादलाने उत्तर प्रदेशाला ४९-३१ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.